कौतुकास्पद! चंद्रपुरातील शाळेतील विद्यार्थी गिरवत आहेत शिवकालीन लिपीचे धडे
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत. या प्राणप्रिय राज्याचा कार्यकाळात ज्या लिपीचा वापर झालेला आहे, ती लिपी म्हणजे मोडी लिपी. इतिहास अभ्यासक आणि इतिहासाचे विद्यार्थी वगळता ही लिपी फार लोकांना वाचता, लिहिता येत नाही. मात्र चंद्रपूर जिल्हातील एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने नव्या पिढीला या लिपिची ओळख करून दिली आहे.पाचवी ते सातवी वर्गातील 20 विद्यार्थी मोडी लिपीचे वाचन आणि लेखन करू शकतात. विध्यार्थ्यांना नवे दालन खुले करणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे अरुण झगडकर. ते गोंडपिपरी शहरातील जि. प. शाळेतील शिक्षक आहेत.
जिल्हातील गोंडपिपरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोंडपिपरी (मुले) येथील विद्यार्थी मागील तीन महिन्यापासून मोडी लिपीचे धडे गिरवीत आहेत. आत्तापर्यंत वीस विद्यार्थी मोडी लिपीमध्ये उत्तम प्रकारे लेखन व वाचन करीत असल्याचे सुखद चित्र येथे बघायला मिळत आहे. मोडी लिपी ही मायमराठीची एक ऐतिहासीक लिपी आहे. महाराष्ट्रात जवळपास 900 वर्षे या लिपीचा वापर होता. म्हणजेच 13 व्या शतकापासून 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची लिपी ही मोडी होती. शिवाजी महाराजांचा काळ असो की इंग्रज काळापर्यंत या लिपीतील अनेक दस्तऐवज आपणास बघायला मिळतात. झगडकर यांना इतिहासात विशेष रुची आहे. त्यांनी चंद्रपूर जिल्हातील भुगर्भात दडलेल्या इतिहासाचे अनेक पाने उजेडात आणले आहेत. लुप्त झालेली प्राचीन वारली चित्रशैलीची ओळख विध्यार्थ्यांना करून दिली. झाडीबोलीतील विखुरलेल्या हजारो शब्दांना एकत्र करीत त्यांनी झाडीबोली शब्दकोश तयार केला. त्यांच्या नावाने तीन कवितासंग्रह प्रकाशित आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नव्या पिढीला मोडी लिपीची ओळख व्हावी यासाठी त्यांनी सुरु केलेल्या कार्याचे कौतुक केले जात आहे. शनिवार आणि रविवारला झगडकर वर्ग घेतात.मोडी लिपी अवगत करण्यासाठी विद्यार्थी ही उत्साहाने वर्गात सहभागी घेत आहेत. अवघ्या तीन महिन्यात विद्यार्थी मोडी लिपीचे वाचन आणि लेखन करू लागले आहे. विद्यार्थ्यांना जर मोडी लिपीतील दस्तऐवज वाचन करता आले तर भविष्यात हेच विद्यार्थी इतिहास अभ्यासक म्हणून पुढे येतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List