शाखा अधिकाऱ्यानेच केला 9 कोटींचा अपहार, पंढरपूर बँकेच्या बारामती शाखेतील प्रकार
पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक लि. पंढरपूर या बँकेच्या बारामतीतील शाखाधिकाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे या बँकेत सुमारे 9 कोटी 3 लाख 361 रुपयांचा अपहार केला. अमित देशपांडे असे गुन्हा दाखल केलेल्या शाखाधिकाऱ्याचे नाव आहे.
कृष्णकुमार पेंडाल यांनी फिर्याद दिली आहे. ते मुख्य कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करतात. पंढरपूर बँकेच्या राज्यात 30 शाखा आहेत. बारामतीत भिगवण रस्त्यावर जळोची येथे एक शाखा आहे. तेथे अमित देशपांडे हे शाखाधिकारी म्हणून काम करतात. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी ताळेबंदपत्रकाचे अवलोकन केले असता, बारामती शाखेत संशयास्पद व्यवहार होत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर केलेल्या तपासणीत ही बाब स्पष्ट झाली.
देशपांडे यांनी कॅशिअर कम क्लार्क साधना कळंत्रे यांच्या कोडचा वापर करत बनावट कागदपत्रे तयार करून अपहार केला. तसेच बारामती शाखेतील ग्राहकांचे सोने तारण कर्ज खातेप्रकारामध्ये 83 खातेदारांचे बँकेत ठेवलेले खरे दागिने काढून तेथे बनावट दागिने ठेवले. खरे दागिने बाहेरील फायनान्स कंपन्यांना देत त्यावर कर्ज काढले.
10 ग्राहकांच्या नावे बनावट खाती काढली. त्यावर बनावट सह्या करून त्या खात्यांवर कर्ज वितरित केल्याचे व त्या बदल्यात सोने ठेवल्याचे दाखवून त्यांच्या नावे बँकेत बनावट सोने ठेवले. त्याद्वारे 37 लाख 56 हजार 803 रुपये स्वतःसाठी वापरले. बँकेतील सोने तारण कर्ज खाते प्रकारामध्ये 3 कोटी 18 लाख 37 हजार 464 रुपयांचा अपहार केला. अशी एकूण बँकेचा 9 कोटी 3 लाख 361 रुपयांचा अपहार करत बँकेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक विलास नाळे पुढील तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List