बेळगावकडे जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखले, कानडी नागरिकही महाराष्ट्रात राहतात याचं भान ठेवा!
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मराठी भाषिक चळवळीच्या लढ्याचे केंद्र असलेल्या बेळगावमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांच्या भगव्या रॅलीस आज कोगनोळी टोलनाक्याजवळ कर्नाटक पोलिसांनी रोखले. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. त्यामुळे वातावरण प्रचंड तणावग्रस्त झाले होते.
दरम्यान, बेळगावमधील मराठी भाषेचा महामेळावा होण्यापूर्वीच मराठी भाषिक नेत्यांच्या केलेल्या धरपकडीचा तीव्र निषेध करत कानडी नागरिकही महाराष्ट्रात राहतात याचे भान ठेवा. कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांना त्रास दिल्यास जशास तसे उत्तर देणार, असा थेट इशारा शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार तसेच सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिला आहे.
करवीर गादीच्या संस्थापिका रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कावळानाका परिसरातील छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत ही भगवी रॅली बेळगावच्या दिशेने रवाना झाली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कागल परिसरात कोगनोळी टोलनाक्याजवळ ही रॅली आली असता येथे प्रचंड संख्येने जमलेल्या कानडी पोलिसांनी ही रॅली रोखली. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी महामार्गावरच ठिय्या मारून रास्ता रोको केला. कर्नाटक सरकारच्या या दडपशाही विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. महामार्ग रोखल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. अखेरीस पोलिसांनी दडपशाहीचा वापर करत शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, सुनील शिंत्रे, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, सुनील मोदी, भरत आमते, अरुण अब्दागिरी, अवधूत साळोखे, विनोद खोत, अभिजीत पाटील, राजू यादव, शरद माळी, संदीप शेटके, सुरेश चौगुले, संभाजी भोकरे, जयसिंग टिकले, महादेव कुकडे, मारुती पुरीबुवा, प्रकाश पाटील आदी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन महाराष्ट्राच्या हद्दीत सोडले.
कर्नाटक सरकार मराठी माणसांना कशासाठी घाबरते? – संजय पवार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. लोकशाही मार्गाने भूमिका मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार संविधानाने दिला आहे. मात्र, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अत्याचार करत आहे. ही लोकशाही नसून कर्नाटक सरकारची हुकूमशाही आहे. कर्नाटक सरकारचे पोलीस आम्हाला अडवतात. आम्ही काय अतिरेकी आहोत का? कर्नाटक सरकार मराठी माणसांना कशासाठी घाबरते? असा सवाल शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. कर्नाटक सरकारने मराठी भाषिक माणसाच्या भागावर अतिक्रमण केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी बांधवांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि यापुढेही राहणार, असे पवार यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List