ईव्हीएम नको, मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या! कराडमधील कोळेवाडी ग्रामसभेमध्ये ठराव, राज्यातील पहिली ग्रामपंचायत
ईव्हीएम मशीनवर होणारे मतदान संशयास्पद होत आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकीत ईव्हीएमवर नव्हे, तर मतपत्रिकेवर शिक्का मारून (बॅलेट पेपरवर) मतदान घ्यावे, अशा मागणीचा ठराव कराड तालुक्यातील कोळेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने घेतला आहे. दरम्यान, ग्रामसभेत ‘ईव्हीएम नको’ असा ठराव करणारी कोळेवाडी ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी 27 नोव्हेंबर रोजी ग्रामसभा बोलावली होती. या ग्रामसभेत ‘ईव्हीएम नको, बॅलेट पेपरवर मतदान घ्या,’ असा ठराव वसंत रामचंद्र भोसले यांनी मांडला होता. त्याला शंकर पांडुरंग पाटील यांनी अनुमोदन दिले. या ग्रामसभेला कोळेवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच रत्नमाला शंकर पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कोळेवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाची प्रत आज प्रसिद्धीसाठी दिली. यामध्ये भारतात संसदीय लोकशाही आहे. लोकशाहीत निवडणूक व मतदान संवैधानिक प्रक्रिया आहे. यापूर्वी मतपत्रिकेवर मतदान घेतले जात होते. त्यावेळी आतासारखा मतदानात संशयकल्लोळ कधीच झाला नाही. मात्र, सध्याचे मतदान, निकाल व अनेक बाबी संशयाच्या घेऱ्यात अडकल्याचे दिसत आहे. हे लोकशाहीला मारक आहे. साधारण 2000 सालापासून ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अलीकडेच देशात ईव्हीएमवरील मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात का सापडली आहे हा प्रश्न आहे.
ईव्हीएमची मतदान प्रक्रिया संशयास्पद का झाली याबाबत आमच्याही मनात संशय व अनेक शंका आहेतच. विशेषतः सत्ताधारी पक्षाबद्दल सर्वत्र मतदारांमध्ये निराशाजनक वातावरण असताना व मतदारांची होणारी सत्ताविरोधी मानसिकता व संशय लोकशाहीसाठी धोकादायक वाटते. यासाठी खुल्या मनाने व संशयविरहित मतदान निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे व सर्वांचा मतपत्रिकेवर मतदान या प्रक्रियेवर विश्वास आहे. म्हणून भविष्यात जरी वेळखाऊ प्रक्रिया असली तरीही पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी या ठरावाद्वारे आम्ही केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List