बेळगावला केंद्रशासित करण्याचा ठराव एकमताने मंजूर करू, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
बेळगावमधले लोकही हिंदू आहेत, मग त्यांच्यावर एवढे अत्याचार का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच बेळगावला केंद्रशासित करण्याचा ठराव मांडा, आम्ही तो एकमताने मंजूर करू असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे.
विधीमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेपुढे एकच प्रश्न आहे की हे सरकार कुणाचे आहे हे सरकार जनतेचे आहे की निवडणूक आयोगाने निवडलेले आहे. याचे उत्तर आम्हाला अजूनही मिळालेले नाही.
तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पत्र लिहिले आहे की, आजच्या अधिवेशनात बेळगावला केंद्रशासित करा आम्ही एकमताने हा ठराव आम्ही मंजूर करू. बेळगावचे स्थानिक लोक हिंदूच आहेत, जे लोका आम्हाला इथे येऊन बटेंगे तो कटेंगे म्हणतात हे लोक अशावेळी जातात कुठे? बेळगावमधले लोक हिंदू आणि मराठी आहेत मग त्यांनी एवढे अत्याचार का सहन करावेत? यावरही भाजपने उत्तर देणे अपेक्षित आहे. बेळगावमधली परिस्थिती न चिघळता पंतप्रधान मोदींनी मध्यस्थी करून बेळगाव केंद्रशासित जाहीर करावं अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश करण्याच्या प्रस्तावाला आम्ही एकमताने पाठिंबा देण्यास तयार आहोत; तसेच राज्य शासनाने लवकरात लवकर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशा मागणीचं पत्र महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना आज… pic.twitter.com/IPJGmzkolQ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 9, 2024
राज्यात आणि केंद्रात त्यांचं सरकार आहे, मित्रपक्षाचं सरकार आहे. त्यांनी इथे ठराव मांडून मंजूर करून केंद्रात पाठवायला हवा होता. संसदेतही अधिवेशन सुरूच आहे. जोव निकाल लागत नाही तोवर बेळगावला केंद्रशासित करा. फक्त वातावरण चिघळवण्यात काहीही अर्थ नाही. खोटी आश्वासनं मी मागच्या वर्षीही पाहिली होती यावेळीही पाहिली अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
कर्नाटकातल्या मंत्र्यांच्या मनात महाराष्ट्रद्वेष का आहे? जे कर्नाटकचे मंत्री बोलले त्याच्याशी आपले मुख्यमंत्री सहमत आहेत का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला.
समाजवादी पक्ष भाजपची बी टीम
अबु आझमी लोकसभा निवडणुकीत ईडीला घाबरून घराबाहेर पडले नव्हते. महाराष्ट्रातली समाजवादी पक्ष ही भाजपची बी टीम आहे. विधीमंडळात ते कुणाच्या इशाऱ्याने कसे नाचतात हे आम्ही जवळून पाहिले आहे असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List