महिलांना दर महिन्याला सात हजार रुपये, देशात विमा सखी योजनेला सुरुवात
राज्यातील लाडकी बहीण योजनेप्रमाणे सध्या एलआयसीच्या विमा सखी योजनेची चर्चा सुरू आहे. आज ही योजना लाँच होत आहे. या योजनेंतर्गत सुशिक्षित महिलांना पहिली तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या महिला आर्थिक साक्षरता आणि विम्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम करतील. प्रशिक्षणादरम्यान महिलांना दरमहा सात हजार रुपये एवढी रक्कम मिळेल. प्रशिक्षणानंतर महिलांना एलआयसीमध्ये विमा एजंट म्हणून काम करता येईल. याशिवाय पदवी उत्तीर्ण इन्शुरन्स सखींना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी मिळणार आहे. विमा सखी योजना महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येत आहे. योजनेचा भाग बनणाऱ्या महिलांना ‘विमा सखी’ म्हणून ओळखले जाईल. ते आपल्या परिसरातील महिलांना विमा मिळवून देण्यासाठी मदत करतील, ज्यामुळे त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
दर महिन्याला स्टायपेंड
विमा सखी योजनेच्या सुरुवातीला महिलांना दरमहा सात हजार रुपये दिले जाणार आहेत. दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी दरमहा पाच हजार रुपये दिले जातील. विमा सखींनी आपले टार्गेट पूर्ण केले तर त्यांना स्वतंत्र कमिशनही दिले जाईल. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगार दिला जाणार आहे.
काय आहेत अटी?
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांकडे किमान मॅट्रिक/हायस्कूल/दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
18 ते 70 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील.
एलआयसीची विमा सखी केवळ महिलांसाठी आहे. ही शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेत सहभागी झाल्यानंतर दहावी उत्तीर्ण महिलांना पहिली तीन वर्षे प्रशिक्षण देण्यात येणार असून या काळात त्यांना दरमहा स्टायपेंड मिळेल.
या योजनेंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही संस्थेची कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही. त्यांना महामंडळाच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे अधिकार व लाभ मिळणार नाहीत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List