नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा, गळ्यात मांजा अडकल्याने तरुण जखमी
दुचाकीवरून निघालेल्या तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजा घासल्याने जखम झाली. तसेच हाताचे बोट कापले गेल्याची घटना रविवारी दुपारी स्वारगेट भागातील डायस प्लॉट ब्रिजवर घडली. संबंधित तरुणाच्या हाताला टाके पडले आहेत. दरम्यान, यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र, तरीही शहरात नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले असून, संबंधितांवर कारवाईची मागणी नागरिक करीत आहेत.
संबंधित तरुण वाघोली येथे कामासाठी गेला होता. दुपारी तो भारती विद्यापीठकडे त्याच्या राहत्या घरी परत जाताना डायस प्लॉट ब्रिजवर ही घटना घडली. अवघ्या काही दिवसांवर मकरसंक्रांतीचा सण येऊन ठेपला असून, या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्यात येतात. त्यासाठी अनेकजण धोकादायक अशा नायलॉन मांजाचा वापर करतात. त्यामुळे गळा चिरणे, अपघातासह गंभीर घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून दरवर्षी पोलिसांकडून बेकायदेशीर नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. गतवर्षीदेखील तशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक विक्रेत्यांवर वॉच ठेवून होते. काही विक्रेत्यांवर कारवाईदेखील करण्यात आली होती. मात्र, तरीही चोरीछुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. हे पतंग उडविण्यासाठी काहीजणांकडून सर्रासपणे बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर केला जातो. नायलॉन, काचेची कोटिंग लावलेला मांजा वापरला जातो. पतंग उडविताना मांजा तुटला की, तो रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या तसेच विजेचे खांब, वायरमध्ये अडकतो. परिणामी वाहनचालकाला गंभीर जखमा झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सध्या बाजारपेठांमध्ये पतंगांबरोबरच मांजांचे अनेक प्रकार दाखल झाले असून, नागरिकांनीदेखील मांजा खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
कारवाईत सत्यता नाही
मकरसंक्रांतीच्या सणानिमित्ताने शहर परिसरात पोलिसांकडून दरवर्षी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली जाते. मात्र, या कारवाईत सातत्य नसल्याने इतरवेळी ते बाजारात उपलब्ध होतात. त्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईत सातत्य नसल्याने विक्रेत्यांचे फावत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List