प्रचारासाठी 2 दिवसात दीड हजार किलोमीटर प्रवास अन्…; मराठी अभिनेत्याने शेअर केला निवडणुकीचा अनुभव
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आता उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणूक काळात ठिकठिकाणी प्रचार सभा झाल्या. काही कलाकारही या निवडणुकीत प्रचार करताना दिसले. अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते किरण माने यांनी निवडणूक काळात प्रचार सभा घेतल्या. या प्रचार सभांचा अनुभव किरण माने यांनी शेअर केला आहे. याबाबत फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
सतत डोळे पाणावत होते… शहारत होतो… मी राजकारणात खुप नवखा आहे. सर्वसामान्य घरातून आलेला एक अभिनेता. बास. ‘बुडता हे जन न देखवे डोळा ।’ या तुकोबारायानं माझ्यात रूजवलेल्या कळवळ्यापोटी मी या क्षेत्रात आलो. पण राजकारणी हे रूक्ष, कोरडे, भावनाशुन्य असतात असा एक समज होता माझा. गेल्या दोन दिवसांत प्रचारासाठी महाराष्ट्रभरात दीड हजार किलोमीटर प्रवास केला आणि पटलं की किमान माझ्या उद्धवजींची शिवसेना तरी तशी नाही!
पहिली गोष्ट म्हणजे ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ठाकरेंची ‘शिवसेना’ या नांवांचा महाराष्ट्रभरात काय तुफानी करीश्मा आहे ते मी प्रत्यक्ष अनुभवलं. दुसर्या एका गोष्टीनं मला चकीत केलं ते म्हणजे, गांवांगांवातल्या शिवसैनिकांनी माझी गाडी थांबवून माझं मनभरून स्वागत केलं. त्यात फाॅरमॅलिटीचा भाग कमी आणि ‘आमचा मोठा भाऊ आलाय’ ही भावना जास्त दिसली. राजकारणात असंही ‘दिल से दिल का तार’ जोडणारं नातं असतं? माझा विश्वास बसत नव्हता.
…शिवसेनेत मी कालपरवा आलोय, पण सगळे शिवसैनिक त्याची कणभरही जाणीव होऊ न देता मला तळहातावर झेलत होते. मी अक्षरश: भारावून जात होतो. रहिमतपूर, वाई, ठाणे, देवळाली, मनमाड आणि अंमळनेर… जाईन तिथले शिवसैनिक माझी अतिशय आतुरतेनं वाट पहात होते. मी राजकारणात खुप नवखा आहे. पण शिवसैनिकांनी मला कणभरही ती जाणीव होऊ दिली नाही. गांवात पाऊल ठेवेपासुन निघेपर्यन्त सतत माझी काळजी घेणं हे माझ्या काळजाला स्पर्शून गेलं. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ म्हणजे काय ते त्यांच्या पुण्यतिथी दिवशी अनुभवत होतो… मी भाषणाला उभा राहिल्यावर शिवसैनिकांचा जल्लोष पाहून माझे डोळे पाणावत होते…
अंमळनेरमध्ये नुकतेच शिवसेनेचे नविन कार्यालय उभे राहिलेय… त्या कार्यालयातले आणि प्रचारसभेच्या तिथले काही क्षण !
भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ।।
जय महाराष्ट्र!!!
– किरण माने.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List