शाहरुखने 30 वर्षांनंतर सोडली स्मोकिंग; एका दिवसात ओढायचा 100 सिगारेट्स
बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शाहरुखने त्याच्या चाहत्यांसोबत संवाद साधला. याच कार्यक्रमात शाहरुखने स्मोकिंग सोडल्याचं चाहत्यांना सांगितलं. यावेळी काही चाहत्यांनीही धुम्रपान सोडण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांना शाहरुखने सल्ला दिला. “तीस वर्षांनंतर स्मोकिंग सोडणारा मी कोणासाठीच आदर्श व्यक्ती नाही”, असं तो म्हणाला. शाहरुखचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये शाहरुख चाहत्यांना म्हणतोय, “आयुष्यात जेव्हा जेव्हा जे जे चांगलं वाटेल, ते करा. मी काही आदर्श व्यक्ती नाही. ही सर्वांत वाईट गोष्ट आहे की ती वर्षे स्मोकिंग केल्यानंतर मी तुम्हाला धुम्रपान न करण्याचा सल्ला देत आहे. सिगारेट पिणं चांगली गोष्ट नाही हे आपल्याला माहीत आहे. ही सवय आपण सोडू शकलो तर चांगली गोष्ट आहे. जर ही सवय सोडू शकलो नाही तर ते वाईट आहे. पण तुम्ही तुमच्या वेळेनुसार जे योग्य वाटेल तसं करा.” शाहरुख एकेकाळी दिवसाला 100 सिगारेट ओढायचा. याचा खुलासा त्यानेच एका मुलाखतीत केला होता.
“Jab jab zindagi me jaisa accha lage woh karo… Main koi aisa role model nahi hoon… It is the worst thing that after smoking for 30 years I’m giving the advice don’t smoke. We always know it is not good to smoke, we can give it up – very good. We can’t give it up – very bad. But… pic.twitter.com/mgRH8euQKv
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) November 3, 2024
चाहत्यांसोबत संवाद साधताना किंग खानने त्यांना प्रेरणादायी सल्लासुद्धा दिला. आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कोणतीही असली तरी स्वप्नांचा पाठलाग सोडू नका, असं तो म्हणाला. यावेळी त्याने स्वत:चं उदाहरण दिलं. “मी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो. माझ्या पालकांना मला शिकवायचं होतं म्हणून मी शिकलो. तेच शिक्षण मला माझ्या आयुष्यात कामी आलं. आमच्या क्षेत्रात बऱ्याच जणांची काहीच पार्श्वभूमी नाही. तुम्हाला यावर विश्वास ठेवावा लागेल की तुम्ही कुठून प्रवासाची सुरुवात करताय ते महत्त्वाचं नाही. तुम्ही फक्त मेहनत करत राहा, वाचत राहा आणि लिहित राहा. तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहिलात तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल”, असं तो म्हणतो.
तीस वर्षे स्मोकिंग केल्यानंतर शाहरुखने अखेर धुम्रपान सोडल्याचं जाहीर केलं. “गुड न्यूज ही आहे की मी आता स्मोकिंग करत नाही. धुम्रपान सोडल्यानंतर मला श्वास घ्यायला फारसा त्रास होणार नाही असं वाटलं होतं. पण आतासुद्धा मला थोडा त्रास जाणवतोय. इन्शाल्लाह तेसुद्धा हळूहळू ठीक होईल”, असं शाहरुखने सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List