पाइपलाइनच्या खोदकामात सापडले बॉम्बशेल
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ पाइपलाइन दुरुस्तीसाठी खोदकाम सुरू असताना तीन बॉम्बशेल आढळून आले. पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलीस आयुक्तालयाचे बॉम्ब शोधक-नाशक पथकाने बॉम्बशेलची तपासणी केली असता, हे बॉम्बशेल निकामी असल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी (दि. 30) दुपारी साडेबाराच्या सुमारास चिंचवड-प्रेमलोक पार्क येथील नाल्याजवळ हा प्रकार उघडकीस आला.
चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयाजवळ असणाऱ्या प्रेमलोक पार्क येथील नाल्याजवळ महापालिकेकडून पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू होते. खोदकाम सुरू असताना, दुपारी साडेबाराच्या सुमारास बॉम्बसदृश तीन वस्तू सापडल्या. पाइपलाइन दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलीस आयुक्तालयाचे बॉम्ब शोधक-नाशक पथक व श्वानपथक तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी सापडलेल्या वस्तू बॉम्बशेल असून, त्यांची तपासणी केली असता, हे बॉम्बरोल निकामी असल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील, चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी भेट दिली. तीनही बॉम्बशेलबाबत अधिक चौकशी व तपास सुरू असून, हे बॉम्बशेल सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संरक्षण विभागाच्या सदर्न कमांडच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List