महाराष्ट्रातील राजकारणात विष कालवण्याचं काम फडणवीसांचे, संजय राऊत यांचा हल्लाबोल
श्रीगोंदा येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचार सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप-मिंधे महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला. या महाराष्ट्रात, महाराष्ट्रातील राजकारणात विष कालवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलंय, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
रिक्षा चालवायचा तो आता मुख्यमंत्री झाला. ही शिवसेना अशीच आहे. आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये ना कोणाचा कारखाना, ना शाळा, ना सुतगिरणी, ना डेअरी, ना दूध उत्पादक संघ, ना बँक. काय नसतं आमच्याकडे. तरीसुद्धा आमचे 18 खासदार आहेत. 20-20 खासदार, 60-60 आमदार निवडून येतात. 45 वर्षे मुंबईची महानगरपालिका आम्ही जिंकतोय. भले भले मोदी पण येऊन थकला. ही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना आहे, ही एकनाथ शिंदेची शिवसेना नाही. आले किती गेले किती. ही सामान्य मराठी माणसाच्या कष्टातून, घामातून, त्यागातून निर्माण झालेली शिवसेना आहे, असा टोला संजय राऊत यांनी गद्दारी करणाऱ्यांना लगावला.
या जिल्ह्यामध्ये राहुल जगतापनं काही नसताना बंडखोरी केली. त्या दिवशी मी यांना विनंती केली त्यांच्या घरी जा आणि त्यांना सांगा आपण सगळे महाविकास आघाडी म्हणून काम करतोय. मग मला कळलं की त्यांना देवेंद्र फडणवीस ऑपरेट करतायेत. या महाराष्ट्रात, महाराष्ट्रातील राजकारणात विष कालवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसनी केलंय, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
गेल्या 3 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात नवीन शब्द आलेला आहे. मगाशी मी ऐकत होतो की बाळासाहेब ठाकरे, माननीय शरद पवार, बापूंचा फोटो लावलाय, अण्णांचा फोटो लावलाय, राहुल गांधींचा फोटो लावलाय आणि मतं मागतायत. अजून एक फोटो त्यांनी लावायला पाहिजे. डोनाल्ड ट्रम्पचा पण फोटो लावायला पाहिजे. कालच अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकलेत. डोनाल्ड ट्रम्पचा फोटो लावा आणि सांगा डोनाल्ड ट्रम्प पण त्यांच्या महाविकास आघाडीचा. एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प, एका बाजूला कमला हॅरीस. असे फोटो लावून मतं मिळतात का?. एकनाथ शिंदे पण लावतो बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावतो म्हणून काय त्याची शिवसेना झाली का? अजित पवार पण शरद पवारांचा फोटो लावतो म्हणून काय पवार साहेबांचा पक्ष त्याचा झाला का? हे खेळ बंद करा. लोकांना कळतं, असा भीमटोला संजय राऊत यांनी लगावला.
राहुल गांधींनी विचारले, आपकी शिवसेना का मंत्र क्या है? कैसे इतने साल से पार्टी चला रहे हो? इतने लोग छोड के चले गए है. मी बोललो एक बताऊ क्या राहुलजी, ‘आमच्या शिवसेनेचा एकच मंत्र आहे, फटे लेकीन हटे नहीं’. मागं नाही हटायचं. मला ईडीवाले अटक करायला आले, मला नेलं आणि तुरुंगात टाकलं. त्यांना वाटलं मी घाबरेन आणि भाजपमध्ये जाईन. सकाळी सात वाजता आले. मी म्हटलं अरेस्ट करो. तर म्हणाले हमको ऑर्डर नहीं अरेस्ट करने का. मी बोललो आपको ऑर्डर आ जायेगा, लेकीन मुझे 4 बजे लेट हो जायेगा अभी अरेस्ट करो. फटे लेकीन हटे नहीं, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेना डरपोक लोकांचा पक्ष नाही. हा स्वाभिमानी मराठी माणासाचा पक्ष आहे. हा सरळ मार्गाने काम करणाऱ्यांचा पक्ष आहे. सत्ता येते, सत्ता जाते. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला नेहमी सांगितलं. आपण सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही संजय, सत्ता आपल्यासाठी आहे, आपण जिथे बसू तिथे सत्ता सुरू होते. अशा या शिवसेना परिवारामध्ये श्रीगोंद्यात साजन पाचपुते आले. अनुराधा नागवडे ताई आल्या, नागवडे परिवार आला. आम्हाला आनंद झालाय. आमचं कुटुंब वाढतंय. ताईंना मी सांगितलं. आता तुम्ही इथेच रहायचंय आता तुमचं जे काही भलं होईल राजकारणात ते इथेच होईल. साजन तुम्ही सुद्धा चिंता करायची नाही. उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलंय तुमची जबाबदारी आमची आहे आता. आमचं कुटुंब आमची जबाबदारी, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी दिला.
मी साजन भाईला विचारलं कसं काय राहुल जगताप तिकिट मागत होते. ते बोलले साहेब शेतकऱ्यांचे पैसे यांनी बुडवलेले आहेत, शेतकरी गावात येऊ देत नाहीत त्यांना. मग अशा माणसाला तिकिट देऊन महाविकास आघाडी आपली एक जागा कशाला वाया घालवेल. कितीही फोटो लावू द्या शरद पवार साहेब हे पूर्णपणे अनुराधा ताई अधिकृत उमेदवाराच्याच मागे उभे आहेत. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा ताई आहेत. आणि आमदार म्हणून निवडून जाणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
श्रीगोंद्याचा गमतीशीर इतिहास मी ऐकला. पाचपुत्यांच्या घरात 40-40 वर्षे सत्ता आहे. साजनने सत्ता चांगली भोगली आहे म्हणजे आणि सत्तेचं अजीर्ण झाल्यामुळे ते आपल्यासोबत आलेले आहेत, अशी कोपरखळी मारताच एकच हशा पिकला. साजन आता आपल्याला सगळ्यांना मिळून या तालुक्याचा विकास काय असतो हे दाखवायचं आहे. इतकी मोठी मोठी माणसं या भागात निर्माण झाली. बापू 7-8 वर्षे या भागात आमदार होते. त्यांना फार कमी वेळ मिळाला. ही आपली भावकी 40 वर्षे. 40 वर्षे म्हणजे काय झालं राव. इतकी सत्ता भोगली की आता बोलता येत नाही. आता हरण्याच्या भीतीने परत वाचा आली हे गणित आपल्याला बदलायचंय. एक संधी अनुराधाला ताईला द्या, असे आवाहन यावेळी संजय राऊत यांनी मतदारांना केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List