मोदी आमचे चांगले मित्र; अमेरिकेतील हिंदूंचे संरक्षण करू! – डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत स्थायिक झालेल्या परदेशी नागरिकांना आकर्षिक करण्याचे प्रयत्न उमेदवारांनी सुरू केले आहेत. दिवाळीचा मुहूर्त साधत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हिंदुस्थानींना शुभेच्छा देत हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे. हिंदुस्थान आणि अमेरिकेतील भागीदारी आणखी मजबूत करण्याचे आणि अमेरिकेतील हिंदूंचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवरील रानटी हिंसाचाराचा मी तीव्र निषेध करतो. मी राष्ट्राध्यक्ष असतो तर हे कधीच घडले नसते, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. कमला हॅरीस आणि जो बायडेन यांनी जगभरातील तसेच अमेरिकेतील हिंदूंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. इस्त्रायल ते युक्रेन आणि आमच्या स्वतःच्या दक्षिण सीमेपर्यंत तणाव आहे. परंतु, आम्ही अमेरिकेला पुन्हा मजबूत बनवू आणि सामर्थ्याने शांतता परत आणू, असे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत मला आशा आहे की प्रकाशाचा सण वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देईल, अशा शब्दांत त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत अटीतटीची लढाई सुरू आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी राष्ट्राध्यक्ष कोण होणार, कोण बाजी मारणार याची जगभरात उत्सुकता लागली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List