‘शाळेची फी कमी करणार, प्रत्येक मुलाला चांगल्या पगाराची नोकरी’, मनसेच्या गजानन काळे यांचा बॉण्ड पेपरवर शब्द
राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. मनसे नेते गजानन काळे यांना पक्षाकडून बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. गजानन काळे उमेदवारी मिळाल्यानंतर चांगलेच कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून जोरदार प्रचार केला जातोय. विशेष म्हणजे गजानन काळे यांनी दोन 500 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर नागरिकांना मोठमोठे आश्वासने दिली आहेत. मुलांच्या शाळेची फी कमी करणार, प्रत्येक मुलाला एमआयडीसीच चांगल्या पगाराची नोकरी देणार, असं आश्वासन गजानन काळे यांनी बॉण्ड पेपरमध्ये दिलं आहे. त्यामुळे गजानन काळे यांची बोलापूर आणि संपूर्ण नवी मुंबईत चांगलीच चर्चा देखील आहे. गजानन काळे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देखील दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
“लोकांना बदल हवा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक 10 वर्ष ऐरोली विधानसभेचे आमदार होते. त्यांनी एकही प्रकल्प आणला नाही. त्याचबरोबर भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी सुद्धा बेलापूर मतदारसंघात शून्य काम केलं आहे. या दोघांच्या तुलनेत मनसे सातत्याने काम करत आहे. तसेच संदीप नाईकांनी यांनी वेळेत पक्षप्रवास केलेला आहे. तो सर्वसामान्य जनतेला मान्य नाही. त्याचबरोबर हे दोन नापास उमेदवार आहेत”, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.
गजानन काळे यांचा बॉण्ड पेपरवर शब्द काय?
“नवी मुंबईचे नेते फक्त खोटे जाहीरनामा प्रसिद्ध करतात. तसेच निवडून आल्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी काही करत नाहीत. मी 500 रुपयांच्या दोन बॉण्ड पेपरवरती लेखी स्वरुपात शब्द दिला आहे. शाळेची फी कमी करणार, आरोग्याच्या सोयी सुविधा चांगल्या उपलब्ध करून देणार, तसेच नवी मुबंईतील प्रत्येक मुलाला एमआयडीसीत रोजगार उपलब्ध करून देणार”, असं बॉण्ड पेपरवरती मी लिहून दिलं आहे
‘संदीप नाईकांवर गुन्हा दाखल करावा’, गजानन काळेंची मागणी
“नुसतं कचराच्या डब्बे वाटप करत बसले आहेत. हा इतकाच कार्यक्रम संदीप नाईकांकडे राहिला आहे. संपूर्ण बेलापूर परिसरात गरम पाण्याच्या कॅटल्या वाटल्या आहेत. निवडणूक आयोगाने संदीप नाईकावंर गुन्हा दाखल करावा”, अशी मागणी गजानन काळे यांनी केली आहे. तसेच “जनतेने मनसेला मतदान करावं. माझा विश्वास आहे आम्ही नक्की जिंकून येऊ”, असंदेखील गजानन काळे यावेळी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List