“एकेदिवशी त्यांना सगळं समजेल तेव्हा..”; करण जोहरने मुलांविषयी व्यक्त केली भीती
‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’च्या नव्या सिझनमध्ये सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले. एका एपिसोडमध्ये अभिनेत्री नीलम कोठारी तिच्या पहिल्या लग्नाविषयी पहिल्यांदाच व्यक्त झाली. तर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसुद्धा यावेळी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. आता नेटफ्लिक्सच्या मुलाखतीत करणने त्याच्या मुलांकडून विचारल्या जाणाऱ्या कठीण प्रश्नांविषयी सतत मनात भीती वाटत असल्याचा खुलासा केला आहे. 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून करण दोन मुलांचा पिता बनला. यश आणि रुही अशी त्याच्या मुलांची नावं आहेत.
नीलम कोठारीच्या पहिल्या घटस्फोटाविषयी बोलताना करण म्हणाला, “मी तुझ्या (नीलम) आयुष्यातील त्या कठीण टप्प्याचा एक भाग आहे. मला ते दिवस अजूनही स्पष्ट आठवतात. माझे डोळे पाणावलो होते. तू तुझ्या मुलीविषयी बोललीस आणि ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली होती. मला सतत ही भीती वाटते की माझ्या मुलांकडूनही त्या प्रश्नांचा भडीमार होणार आणि मला त्यांची उत्तरं द्यायची आहेत. माझी परिस्थिती कशी आहे आणि आमच्या मॉडर्न फॅमिलीविषयी त्यांना समजावून सांगावं लागणार आहे. कधी ना कधी त्यांना गोष्टी समजतील आणि त्यांना उत्तरं मलाच द्यावी लागणार आहेत. एकल पालक म्हणून मीच माझ्या मुलांना उत्तर देण्यासाठी बांधिल आहे. मला त्याच्या बऱ्याच गोष्टी समजावून सांगाव्या लागतील.”
या एपिसोडमध्ये नीलम कोठारी म्हणाली, “मी कामावरून आले आणि अहाना तिच्या मैत्रिणींसोबत होती. नेहमी ते सतत इथेतिथे धावत, उड्या मारत, ओरडत खेळत असतात. पण त्यादिवशी घरात सगळेच शांत होते. अहाना माझ्याजवळ आली आणि म्हणाली की, आई तू मला कधीच सांगितलं नाहीस की तुझा घटस्फोट झाला आहे. तो प्रश्न ऐकून माझं विश्वच संपुष्टात आलं होतं. माझ्याकडे काहीच शब्द नव्हते. मी अहानाला विचारलं की तुला हे कोणी सांगितलं? त्यावर ती म्हणाली, तू सेलिब्रिटी आहेस, त्यामुळे माझे मित्रमैत्रिणी तुझ्याविषयी गुगलवर सर्च करत होते. त्यांना पहिली गोष्ट हीच दिसली की तुझा घटस्फोट झाला आहे. तुझं लग्न झालं होतं.”
नीलम कोठारीने 2011 मध्ये अभिनेता समीर सोनीशी दुसरं लग्न केलं. 2013 मध्ये त्यांनी अहानाला दत्तक घेतलं होतं. तर दुसरीकडे करण जोहरला सरोगसीच्या माध्यमातून जुळी मुलं झाली. याआधीही विविध मुलाखतींमध्ये करण त्याच्या मुलांच्या संगोपनाविषयी, एकल पालकत्वाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. आई हिरू यांच्यासोबत मिळून करण त्याच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतोय. त्याची मुलं त्याला त्यांच्या आईविषयी आणि जन्माविषयी प्रश्न विचारू लागले आहेत, असंही त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. मुलांच्या या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्याला आवश्यक ते मार्गदर्शन घ्यावं लागलं, असंही तो म्हणाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List