मनतरंग – तारा आणि तिची आई
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
नवरा-बायकोतील बेबनाव, मारामाऱया, शिवीगाळ, एकमेकांचा अनादर आणि भरीला जर व्यसनही असेल तर ते मुलांच्या वाढत्या वयाला आणि त्यांच्या मानसिक आरोग्याला कसे मारक असते याची उदाहरणं सध्याच्या काळात पाहायला मिळतात. ताराच्या या स्थितीप्रमाणेच कुटुंबरचना असेल तर ही मुलं मानसिकरीत्या खचून तणाव, नैराश्याने ग्रासतात अन् व्यसनाधीन होत चुकीचा मार्ग स्वीकारतात.
म, आजच्या आज आम्हाला तुमची अपॉइंटमेंट हवी आहे.’’ ताराची (नाव बदलले आहे) आई घाईघाईत फोनवर बोलत होती. “आजच्या आजच आम्ही येतोय ताराला घेऊन’’ असं म्हणत तिने वेळ ठरवत फोन ठेवून दिला. समुपदेशनासाठी ताराला घेऊन येण्याची तिची गेल्या पाच वर्षांत निदान अकरावी वेळ तरी असेलच. या पाच वर्षांत ताराचं अख्खं कुटुंब सत्रांना हजेरी लावून गेलं होतं. सत्रांसाठी येण्याचं कारण जरी तारा असली तरी तिच्या पूर्ण कुटुंबाला समुपदेशनाची गरज होती आणि हे तिची आई पूर्णत ओळखून होती आणि तिच्या कुटुंबातील एक व्यक्ती कधीही स्वतसाठी यायला तयार नसे. मात्र ताराच्या आईबद्दल किंवा ताराबद्दल काही बोलायचे असेल तर ती तत्काळ सत्रामध्ये हजर होई. ती व्यक्ती म्हणजे ताराचे वडील.
थोडक्यात ताराबद्दल सांगायचं झालं तर ती लहानपणापासून नैराश्याने ग्रासली होती, पण तिच्या कुटुंबीयांना ते लक्षात आलं नव्हतं. ती तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर बराचसा वेळ घालवत असे. तिच्या आई-वडिलांना ही गोष्ट खटकत असली तरी तिचे वडील त्याकडे कानाडोळा करत. “आपली मुलगी स्वतचं आयुष्य जगतेय. करू दे तिला एन्जॉय.’’ असं म्हणत ते ताराच्या आईला गप्प करायचे. हळूहळू मात्र या सगळ्याचा वाईट परिणाम त्यांनाही जाणवायला लागला. तारा अभ्यासात मागे पडू लागली. त्याचे तिला काहीही वाटत नव्हते. “मला माझ्या मित्रपरिवारात राहू दे’’ असं ती तिच्या आईबाबांना सांगत होती. ही पहिली वेळ होती ताराला समुपदेशनासाठी घेऊन येण्याची.
“आमची मुलगी अशी का वागतेय?’’ हा प्रश्न तिच्या आईवडिलांनी जेव्हा विचारला तेव्हाच तारा त्यांच्यावर भडकली होती. “तुम्ही माझ्यासाठी काय केलंत? माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं?’’ असं म्हणत तिने त्यांच्याबरोबर सत्रात बसायला नकार दिला होता. मग हळूहळू तिला शांत करत तिची सत्रे चालू झाली खरी, पण त्यात सातत्य नव्हते. मूळची मुडी असणारी तारा जरा काही तिच्या मनासारखं झालं नाही की, चिडचिड सुरू करत असे. तिने बऱयाचदा स्वतला संपवण्याचाही प्रयत्न केला होता. त्या वेळी तिच्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी लागली होती. तेव्हा काही फरक जाणवू लागला होता.
“मॅम, मला आता माझं करीअर करायचंय. मला मदत कराल का?’’ असा प्रश्न तारा आता सत्रांमध्ये विचारू लागली होती. तिची सत्रे व्यवस्थित सुरू असतानाच ती यायची बंद झाली आणि चार महिन्यांनी पुन्हा तिने स्वत फोन केला आणि आईबरोबर आली. ती काही बोलण्याधीच तिच्या आईने तिच्या अवस्थेबद्दल सांगितले. तेव्हा तारा एका मुलाच्या प्रेमात होती आणि पुढच्या सगळ्या पायऱया त्या दोघांनी ओलांडल्या होत्या. त्यात भर म्हणजे ती आता उशिरापर्यंत पाटर्य़ा करतही होती. “तू सत्रे का बंद केलीस?’’ असा प्रश्न तिला विचारताच तिची आई उत्तरली, “तिला नाही यायचं. मी आता किती मागे लागू?’’
“ताराचे वडील नाही का आले?’’ असं तिच्या आईला विचारताच आई गप्प बसली आणि रडायला लागली. “त्यांना इथे यायचंच नाही. त्यांना वाटतं की, माझ्यामुळे माझी दोन्ही मुलं बिघडली आहेत. तेव्हा…’’ तिचं बोलणं मध्येच तोडत ताराही रागारागाने जोरात ओरडली, “तुलाच जर बडबड करायची असेल तर मला का घेऊन येतेस? एकतर तू तरी बस आणि बडबड कर नाहीतर मला तरी बोलू दे.’’
“ही अशीच हल्ली वर्षभर वागतेय मॅम’’ आई म्हणाली. “म्हणजे कशी?’’ असं तिला विचारताच तारा म्हणाली, “मी सांगते मॅम, पण तिला जायला सांगा.’’ आई काय समजायचं ते समजून केबिनबाहेर बसली ती चिंताक्रांत होऊनच.
तारा आता सांगू लागली… “मॅम, माझ्या सारखं सारखं सेशन्स बंक करण्याचं कारण खरं तर माझे आईवडील आहेत आणि माझे वडील जास्त जबाबदार आहेत. आईच्या तोंडाला तर काही लगाम नसतो. ’’
“पण हे आपलं बोलणं आधीही झालेलं आहे आणि तुझ्या आईने स्वतमध्ये बदल केला होता त्या वेळी’’ असं तिला म्हणताच तिने मान होकारार्थी हलवली. “फरक आहे तिच्यात. नाही असं नाही, पण मी अजूनही स्वतला `Insecure’ फील करतेय. हल्ली जास्तच.’’ म्हणत ती काही काळ शांत बसली. त्या वेळी तिने पाण्याचा घोट घेतला आणि पुढे बोलू लागली. “हल्ली दोघांची भांडणं वाढली आहेत. बाबा जास्त चिडचिड करतात आणि बऱयाचदा घरी ड्रिंक्स घेतात. मी डिप्रेशनच्या गोळ्या बंद केल्यात गेले वर्षभर. कारण ते खर्चाचं कारण सारखे देत असतात. बिझनेस लॉसमध्ये आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. आईला तर सारखे टोचून बोलतात. आईने काही पैसे खर्च केले तर तिच्यावर हात उचलतात. मॅम, मला अक्षरश धडकी भरते. असं वाटतं की, दोन व्हिलन मारामारी करताहेत. माझी खाण्यापिण्याची, जगण्याची इच्छा मरून गेलीय. मला नको वाटतं आता सगळं. प्रेमात धोका झाला. त्यामुळे मित्रमैत्रिणींवरचा विश्वास उडालाय.’’ असं बोलून ती खाली मान घालून बसली. तिच्या डोळ्यांभोवती तयार झालेली डार्क सर्कल्स तिच्या अवस्थेची जाणीव करून देत होती.
तारा नैराश्यात जायला तिच्या आजूबाजूची परिस्थिती म्हणजेच तिच्या ‘कुटुंबाची व्यवस्था’ जास्त कारणीभूत ठरली होती. नैराश्यात असणाऱया व्यक्ती बऱयाचदा व्यसनाधीन होऊ शकतात. ताराही त्यात काही काळ होती. औषधोपचारांनी तिला बाहेर काढण्यात आलेले, पण आताची परिस्थिती सांगायची झाली तर तारा आता दारूचे सेवन करत नव्हती. मात्र खेदाची गोष्ट म्हणजे तिचे वडील तिला दारू घेण्यासाठी प्रोत्साहित करत होते…“बेटा, कसलं डिप्रेशन म्हणतेस? एक पेग घे आणि खुश हो…’’ पण ती घेत नव्हती. हे तारानेच एका सत्रामध्ये सांगितलं.
आई हे ऐकून स्तंभित झाली. तिला आपला नवरा इतकं काही करेल असं वाटलंही नव्हतं. ताराच्या आईलाही जेव्हा सत्रात बोलावलं गेलं तेव्हा तिने बरेच खुलासे केले, जे त्यांची कौटुंबिक व्यवस्था किती ढासळली आहे हे दर्शवीत होते. तारा तिच्या आईचा अनादर करण्याचे कारणही वडिलांच्या शिकवण्यात होते हे नंतर लक्षात आले. तिच्या वडिलांनी आईबद्दल ताराच्या मनात अढी निर्माण केली होतीच, पण मुलांसमोरही ते तिला वाटेल ते बोलत असत. तिच्यामुळे मुलं वाया गेली आणि त्यांचे आयुष्य कसे वाया गेले आणि ती जर निघून गेली तर किती चांगलं होईल हे सतत भांडणांमध्ये बोलून दाखवत असत. तसेच चारचौघांमध्ये तिचा पाणउतारादेखील करत असत.
हीच सवय आता ताराला लागली होती. तीसुद्धा आईला उलट बोलून तिच्या अवस्थेला आईच जबाबदार आहे असं म्हणू लागलेली, पण वास्तव वेगळं होतं.
ताराची आई नवऱयाच्या स्वभावाला कंटाळली होती, पण मुलांकडे पाहून स्वतचा अपमान गिळून टाकत होती. त्यांची आर्थिक परिस्थिती कधीही सामान्य नव्हती, पण नवरा मुलांना तसं सांगून सहानुभूती स्वतकडे घेत होता. तेही तिने सहन केलं होतं, पण जेव्हा तारा पुन्हा त्याच गर्तेत गेली तेव्हा तिने शेवटी खंबीर पाऊल उचललं आणि ताराची ट्रीटमेंट पुन्हा सुरू केली.
नवरा-बायकोतील बेबनाव, मारामाऱया, शिवीगाळ, एकमेकांचा अनादर आणि भरीला जर व्यसनही असेल तर ते मुलांच्या वाढत्या वयाला आणि त्यांच्या मानसिक आरोग्याला कसे मारक असते याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे ताराची केस. अशी जर कुटुंबरचना असेल तर मुलं ही मानसिकरीत्या कमजोर (तणाव, नैराश्य, व्यसनाधीन, वाममार्ग) तरी होऊ शकतात.
ताराही अशीच झाली होती. तिला पुन्हा मार्गावर आणण्याचे काम आता मानसोपचार आणि समुपदेशन या दोन्ही पद्धतींनी होणार होते. त्यासाठी त्या दोघींनाही तयार केले गेले. महत्त्वाचं म्हणजे ताराला आईबद्दल असलेले गैरसमजही दोघींच्या एकत्र सत्रांमुळे बऱयापैकी दूर झालेले होतेच. आता शिवधनुष्य होते ते म्हणजे तारा आणि तिच्या आईलाही नैराश्यातून बाहेर काढण्याचे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List