उद्योगविश्व – तब्बल 22 पदार्थांचं ताट
>> अश्विन बापट
‘प्रसादालया’तल्या जेवणाचा थाट म्हणजे खवय्यांची चंगळ आहे. हॉटेल व्यावसायिक गजानन आंधळे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली असून त्यांच्या थाळीमध्ये 22 प्रकारच्या पदार्थांचा समावेश असतो. आमरस थाळी, पुरणपोळी थाळी, दिवाळी थाळी अशा वैशिष्टय़पूर्ण चवी देणाऱ्या या मराठमोळ्या हॉटेलची कहाणी.
मरस थाळी, पुरणपोळी थाळी, दिवाळी थाळी, नियमित थाळी. हा मेन्यू वाचून तोंडाला पाणी सुटलं असेल. हे मेन्यू कार्ड आहे ठाण्याच्या ‘प्रसादालय’ हॉटेलचं. गजानन आंधळे यांनी सुरू केलेल्या या मराठमोळ्या हॉटेलची कहाणी त्यांच्याकडूनच जाणून घेतली.
ते म्हणाले, मी मूळचा बुलढाण्याच्या सिंदखेड राजामधला. मी सहावीत असताना आईचं निधन झालं. घरात लहान बहीण आणि वडील. साहजिकच माझ्यावर जबाबदारी वाढणार हे नक्की होतं. मग काळानुरूप मी घरच्यांसाठी स्वयंपाकही करू लागलो. तिथूनच माझी ही आवड वाढू लागली. पुढे 2012 मध्ये मी मुंबईत आलो आणि मुंबईच्या फिल्मसिटीत ग्राफिक्स-अॅनिमेशनमध्ये नोकरी केली. चार वर्षं ही नोकरी केली. दरम्यान माझी जेवण बनवण्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच काळात ‘मिसळ महोत्सव’ या संकल्पनेने जोर धरलेला. नेमकी हीच बाब मी हेरली. माझी नोकरी सोडली आणि खाद्यपदार्थांकडे वळलो. त्या काळात 2016 मध्ये मी माझ्या अन्य दोन सहकाऱयांसह तब्बल 35 ठिकाणी मिसळ महोत्सव केले. तर वर्षभरात 2017 मध्ये ठाण्यात कोर्ट नाक्यावर मिसळीचं पहिलं आऊटलेट ‘वऱहाडी मिसळ’ सुरू केलं. ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आजमितीला सात वर्षांमध्ये राज्यभरात ठाणे, नवी मुंबई, संगमनेर आदी विविध ठिकाणी मिसळीच्या एकूण 41 शाखा आहेत. आमच्याकडे मिसळीच्या सात व्हरायटी मिळतात. ज्यात मिसळ-भाकरी, दही मिसळ, वडा-मिसळ अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.
वऱ्हाडी मिसळला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच हॉटेल व्यवसायात थाळी संकल्पनाही रुजू लागली. मग मीही त्यात उतरायचं ठरवलं आणि 25 मे 2023 ला ‘प्रसादालय’चा जन्म झाला. ज्याची मूळ रुजवात शेगावमध्ये झाली. तिथे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जे प्रसाद भोजन मिळतं, त्यालाही प्रसादालय असंच नाव आहे. तेच नाव मी हॉटेलला दिलं आणि सुरुवात केली. शेगावमधूनच गजानन महाराजांची मूर्ती आणून ती हॉटेलमध्ये स्थापन केली. सकाळ-संध्याकाळ आम्ही इथे आरतीही करतो. आमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य़ म्हणजे इथे येणारे ग्राहक चप्पल-बूट बाहेर काढून हात-पाय धुऊनच जेवायला बसतात. तसंच इथे जेवण वाढणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्यांचा पेहराव पांढऱया रंगाचा आहे. ते एकमेकांना तसंच ग्राहकांनाही ‘माऊली’ असंच संबोधतात.
आमच्या थाळीमध्ये 22 प्रकारच्या पदार्थांचा समावेश असतो. ज्यामध्ये विविध प्रकारच्या पाच ते सात भाज्या, पिठलं, भाकरी, कुरडई, नियमित गोड पदार्थ मोदक असतो. तर, शेवयाची खीर, गुळाची जिलेबी, श्रीखंड, गुलाबजाम, गाजर हलवा हे गोड पदार्थही आलटून पालटून असतात. शिवाय ताक, लोणचं, पापड, चटणी, कोशिंबीर, ठेचा हे पदार्थही ताटामध्ये असतातच. सीझनल थाळ्यांचा विचार केला तर दिवाळी सणाच्या वेळी दिवाळी थाळी आम्ही देत असतो. यामध्ये चिवडा, लाडूसारखे पदार्थांसोबत भाज्या असतात. आंब्यांच्या मोसमात आमरस थाळीही असते.
आमचं प्रसादालय ठाण्याशिवाय पुणे आणि नाशिकमध्येही सुरू झालंय. तिन्ही ठिकाणी मिळून एकूण 100 कर्मचारी वर्ग आहे तर, मिसळीच्या शाखांमधील कर्मचारी वर्गही यामध्ये धरल्यास माझ्याकडे एकूण 350 कर्मचारी काम करतात. यातील बहुसंख्य माझ्या बुलढाण्यातले तसंच काही बीडचेही आहेत. आपल्या भागातील लोकांना रोजगार मिळावा या हेतूने माझ्या भागातील माणसांना मी माझ्या व्यवसायातील नोकऱयांमध्ये प्राधान्य दिलंय, असंही गजानन आंधळे यांनी आवर्जून सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List