Sada Saravankar : काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काय बोलणं झालं? सरवणकर म्हणाले…
‘दिवाळी जोरात साजरी करतोय. फराळ सुद्धा गोड लागतोय’ असं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सदा सरवणकर म्हणाले. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने सदा सरवणकर यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर मनसेच्या अमित ठाकरेंच आव्हान आहे. सदा सरवणकर यांनी आता उमेदवारी मागे घ्यावी, असा महायुतीकडून प्रयत्न सुरु आहे. त्यावर सदा सरवणकर बोलले आहेत. “काल रात्री मी वर्षावर गेलो होतो, हे नक्की. पण बैठक झाली नाही. मला वेळ मिळतो, तेव्हा मी वर्षावर जात असतो. मी वर्षा बंगल्यावर गेलो, त्यावेळी मुख्यमंत्री विश्रांती घेत होते. त्यांच्या स्टाफशी गप्पा मारल्या” असं आमदार सदा सरवणकर म्हणाले.
‘मी उमेदवार मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी निवडणूक लढणार आहे’ हे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं. तुम्ही पुढचे काही दिवस प्रचार करणार नाही, या पत्रकारांच्या प्रश्नावर सदा सरवणकर म्हणाले की, “असं तुम्हाला कोणी सांगितलं? मी सुरुवात केली. आज माझी बैठक आहे. दिवाळीच्या काळात कोणाच्या दारात जाणं योग्य नाही” विधान परिषदेवर जाणार का? त्यावर ते म्हणाले की, ‘मी लढणारा शिवसैनिक आहे. मी मागच्या दाराने जाणार नाही’ “मी मुंबईतला आमदार आहे. वर्षा बंगल्यावर जात असतो, गेल्यावर प्रत्येकवेळी भेटतो असं नाही” असं सरवणकर यांनी सांगितलं.
‘नागपूरमध्ये फडणवीस काय बोलले, ते पण सांगाना’
माहीममध्ये महायुतीने मनसेला पाठिंबा द्यावा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांची सुद्धा तशीच इच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं. तुमची भूमिका काय? यावर सदा सरवणकर म्हणाले की, “तुम्ही काही गोष्टी तुमच्या सोयीनुसार टाळता. नागपूरमध्ये फडणवीस काय बोलले, ते पण सांगाना. महायुतीचा धर्म पाळणार. महायुतीचा उमेदवार, हाच आमचा उमेदवार असणार असं फडणवीस यांनी सांगितलं”
‘हे सांगणं हास्यास्पद आहे’
भाजपाचा मुख्यमंत्री मनसेच्या मदतीने होईल असं अमित ठाकरे म्हणाले. त्यावर “व्यक्तीगत मतं असतात. ज्यांचा एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोणाचा होणार? हे सांगणं हास्यास्पद आहे. मी त्यांच्यावर टीका करावी, असं मला वाटत नाही. मी महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघात उभा आहे आणि निवडून येणार” असं सरवणकर म्हणाले.
सदा सरवणकर एकटे पडलेत का?
राजपुत्राला तिकीट मिळाल्यामुळे सदा सरवणकर एकटे पडलेत का? त्यावर सरवणकर म्हणाले की, “मी एकटा पडण्याचा प्रश्नच येत नाही. मला जनता जर्नादनाचा, मतदारांचा आशिर्वाद आहे” मी निवडणूक लढवणार. कार्यकर्त्यांची इच्छा मोडता येणार नाही. सर्वसामान्य मतदारांसाठी जिंकून यावं लागेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List