मोदीजी, महाराष्ट्रात तुमची नाही, फक्त ठाकरेंची गॅरंटी चालते! उद्धव ठाकरे यांच्या दणदणीत सभा, भाजपवर जोरदार हल्ला
शेतकरी कष्ट करणार, शेतकरी मेहनत करणार, शेतकरी कर्ज काढणार आणि शेतकरीच कर्जबाजारी होणार… पण शेतकऱयाच्या साखरेला अमित शहांच्या मुंग्या लागणार. जनतेचे साखर कारखाने आजारी पाडणार आणि गुळाच्या ढेपेला चिकटतो तसा त्या कारखान्याच्या गुळाला अमित शहांचा मुंगळा चिकटणार.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी आज पंतप्रधान पदी आहेत, नाहीतर अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना कधीच कचऱयाच्या पेटीत फेकले असते. पण मोदीजी, आता तुमची वेळ निघून गेली. महाराष्ट्रात तुमची गॅरंटी चालत नाही, फक्त ठाकरे गॅरंटी चालते आणि त्या गॅरंटीचा, बाळासाहेबांचा वारसदार म्हणूनच मी जनतेला वचने देतोय, असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. महाराष्ट्राचे भले मोदी-शहा करू शकत नाहीत. लोकसभेत यांचे शेपटावर निभावले, पण आता विधानसभेत महाराष्ट्र यांचे शेपूट कापल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
श्रीगोंदा-अनुराधा नागावडे, नेवासा-शंकरराव गडाख, कन्नड- उदयसिंह राजपूत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या दणदणीत सभा झाल्या. छत्रपती संभाजीनगरातही उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि मोदी-शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे यांनी या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शिवसेना विरोधावरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना संपवायला सगळेच निघाले आहेत. मोदी आणि अमित शहांना सांगेन की, शेतकऱ्यांच्या आयुष्याबद्दल बोला ना, देशाच्या शत्रूंना संपवा ना, उद्धव ठाकरेंना काय संपवताय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी पाप केले असेल तर मायबाप जनता मला संपवेल. पण पाप केले नसेल तर हीच जनता माझ्यासोबत राहून तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, राज्य संघटक चेतन कांबळे, आमदार उदयसिंग राजपूत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, खासदार डॉ. कल्याण काळे यावेळी उपस्थित होते.
श्रीगोंदा येथे उद्धव ठाकरे यांची सभा दुपारी झाली तर मुंबईच्या शिवतीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सायंकाळी होती. त्या सभेसाठी लावलेल्या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला गेला होता. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. ‘शिवसेनाप्रमुखांचा लावलेला फोटो उद्या सगळीकडे छापून येईल. इतकेच नव्हे तर मोदी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर लोळत लोळत जातील आणि मीच बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक, मला मते द्या असे सांगतील,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दार ढोकळा खात होते तेव्हा मी छत्रपती संभाजीनगर नाव केले
आज मोदीजी, देवेंद्र, मिंधे आले होते छत्रपती संभाजीनगरात. जिल्हय़ाचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून मोदींनी तेंड फाटेस्तोवर मिंध्यांचे कौतुक केले. अहो मोदीजी, जेव्हा तुम्ही या गद्दार मिंध्याला सुरतेत ढोकळा खायला घेऊन गेला होतात ना, तेव्हा मंत्रालयात बसून शेवटच्या पॅबिनेटमध्ये मी या जिल्हय़ाचे नाव छत्रपती संभाजीनगर केले होते. नव्हे ’शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करून दाखवले! बाळासाहेब, बाळासाहेब असा काय उल्लेख करताय, ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आहेत… तुमचे वर्गमित्र नाहीत’ असे खडे बोलही उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
माताभगिनींना नोकर समजता काय?
योजनेचे पैसे सरकारकडून घ्यायचे आणि महाविकास आघाडीच्या सभांना जायचे असे चालणार नाही, अशा महिलांचे फोटो काढा, अशा वक्तव्यावरून कोल्हापूरचे खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक हे वादाच्या भोवऱयात सापडले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही त्यांचा आज समाचार घेतला. एकतर महिलांचा असा फोटो काढणे हा गुन्हा आहे. मुन्नाला सांगतोय, इकडे माझ्या माताभगिनी आल्या आहेत त्यांचा फोटो मी तुला पाठवतो, पण एकीच्या केसाला जरी हात लागला तर तुझा हात जागेवर ठेवणार नाही. ही माझी त्याला उघड धमकी किंवा इशारा आहे, काय समजायचे ते समजा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. माताभगिनींना तुम्ही काय तुमचे नोकर समजता? 1500 रुपये देऊन त्या काय तुमच्या नोकर वाटल्या तुम्हाला? कुठून आली इतकी मस्ती? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. यांचे नेतेच असे आहेत तर हे का नाही शेफारणार, असेही ते म्हणाले.
शेतकऱयाच्या साखरेला अमित शहांच्या मुंग्या लागणार
सहकार खात्यावरून उद्धव ठाकरे यांनी या वेळी अमित शहा यांच्यावर शरसंधान केले. आजपर्यंत सहकार हा विषय राज्यापुरता मर्यादित होता. पण अमित शहांनी गेल्या वर्षभरात पेंद्रात सहकार खाते तयार करून ते स्वतःच्या बुडाखाली ठेवलेय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. कारखाना आजारी पाडायचा आणि जवळपास फुकटात तो ताब्यात घ्यायचा, असे उद्योग चालले आहेत. अदानीच्या घशात मुंबई घालताहेत तसे या पट्टय़ातले सर्व साखर कारखाने आणि सहकारी बँका अदानीच्या घशात घातल्या तर जाणार कुठे तुम्ही? जे अपक्ष म्हणून उभे राहिलेले गद्दार आहेत त्यांनीही याचा विचार करावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. जर आज आपण मोदी-शहांना रोखले नाही तर सहकार क्षेत्र संपले म्हणून समजा, असा सावधगिरीचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला.
जेथे जावे तिथे निवडणूक आयोग माझा सांगाती! बॅग तपासणीवरून उद्धव ठाकरे यांचा टोला
श्रीगोंदा आणि नेवासा अशा दोन्ही ठिकाणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱयांनी केली. जिथे जावे तिथे निवडणूक आयोग माझा सांगाती आहे अशी प्रतिक्रिया त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिली. माझ्या सांगाती आलात ठीक आहे, पण चुकीची संगत धरू नका नाहीतर आयुष्य वाईट जाईल, असा सल्ला आपण निवडणूक कर्मचाऱयांना दिल्याचे ते म्हणाले. दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी बॅगा तपासणी वेळी व्हिडियो शूट करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला.
श्रीगोंदा येथील हेलिपॅडवर उतरताच निवडणूक अधिकारी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यासाठी आले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. पॅमेरा हातात असलेल्या निवडणूक अधिकाऱयाला तर त्यांनी पॅमेरा कोणता आहे, किती मेगापिक्सल आहे, किती फ्रेमवर किती सेपंद चालतो, असे प्रश्न विचारून बुचकळ्यात टाकले. इतर अधिकाऱयांनाही त्यांची नावे, राहण्याचे ठिकाण अशी चौकशी केली. आतापर्यंत किती नेत्यांच्या बॅगा तपासल्या, असा प्रश्नही केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची बॅग तपासल्याचे निवडणूक अधिकाऱयांनी सांगितल्यावर सत्ताधारी पक्षाच्या कोणाच्या बॅगा तपासल्या, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. तेव्हा ज्योतिरादित्य सिंधिया आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांची बॅग तपासल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
निवडणूक अधिकारी बॅगा तपासत असताना उद्धव ठाकरेही हास्यविनोद करून त्यांना सहकार्य करत होते. बॅग तपासणाऱया अधिकाऱयाला ते म्हणाले, पैसे वगैरे काही मिळाले नाहीत ना, मग देताय का तुम्ही मला, म्हणजे सर्टिफिकेट देताय का मला, अशी मिश्लिक टिप्पणी त्यांनी केली. तसेच सगळ्यांना तपासा, ही लोकशाही आहे, पंतप्रधान मोदी यांनाही तपासले पाहिजे, त्यांना वेगळे काढता येणार नाही, अशी सूचनाही त्यांनी तिथून निघताना केली.
सापबिप असेल हा, जरा सांभाळून
नेवासा येथे हेलिकॉप्टर लँड झाले तेव्हा हेलिकॉप्टरमधूनच उद्धव ठाकरे यांनी हात दाखवत निवडणूक अधिकाऱयांना बोलवले. निवडणूक अधिकारी येताच त्यांचे ओळखपत्र, नाव-गाव अशी विचारणा करत त्यांनी त्यांना तपासणी करण्यास सांगितले. एक अधिकारी बॅगेची चेन उघडत असताना उद्धव ठाकरे त्याला मिश्किलीने म्हणाले की, बघा हो… सापबिप निघायचा, जरा सांभाळून. उद्धव ठाकरे यांच्या मिश्किलीला त्या अधिकाऱयानेही हसून दाद दिली.
निवडणूक कर्मचारी म्हणाला, सत्ताधाऱयांच्या बॅगांमध्ये आश्वासनांच्या थापा!
निवडणूक कर्मचारीच सत्ताधाऱयांना थापेबाज म्हणत असल्याचा किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगितला. उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींची बॅग तपासली का असे विचारताच हळूच एका कर्मचाऱयाने सांगितले की, साहेब आम्हाला अडचणीत आणू नका. आम्हाला फक्त बॅगांमधून पैशांची ने-आण होतेय का हे तपासायला सांगितले आहे. मी म्हटलं, मग काय, तर तो कर्मचारी म्हणाला, साहेब सत्ताधाऱयांच्या बॅगांमध्ये नोटांच्या थप्प्या नाहीत तर आश्वासनांच्या थापा आहेत. त्या पकडायच्या कशा. मी म्हटले, तुम्ही काळजी करू नका, त्या मोदींच्या आश्वासनांच्या थापांचा निकाल लावायला महाराष्ट्र आसुसला आहे!
माझी बॅग ऑटो चेकिंगवर टाकलीय…
श्रीगोंदा येथे उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर उतरताच निवडणूक कर्मचाऱयांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केली. त्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, आज पुन्हा माझी बॅग तपासली. निवडणूक आयोगाने माझी बॅग ऑटो चेकिंगवर टाकलीय. उद्धव ठाकरे दिसले की बॅग चेक कर. आजपण मी व्हिडियो टाकलाय. मलापण बरं वाटतंय, फोटोग्राफी परत करायला मिळतेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांची बॅग तपासतानाचा व्हिडियो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावरून या वेळी उद्धव ठाकरे यांनी मिश्कील टीका केली. माझी बॅग तपासल्याचा व्हिडियो संपूर्ण देशभर गेला. त्यामुळे ज्यांच्या भाषणाला प्रसिद्धी मिळत नाही तेसुद्धा आता अहो माझं तपासा… माझं तपासा… असं करायला लागलेत. म्हणजे माझं तपासलं तर मीसुद्धा टीव्हीवर दिसेन म्हणून बॅगा तपासून घेताहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. बॅग तपासणी सर्वांचीच करावी असे आपण बोललो. त्यामुळे निवडणूक आयोगाला एक सूचनापत्र जारी करावे लागले. आयोगाला आजपर्यंत असे कधीच करावे लागले नव्हते. पंतप्रधान वगळले तर सर्वांना हे कायदे लागू आहेत असे त्यात म्हटलेय. माझा आक्षेप यालाच आहे. पंतप्रधान मोदी प्रचाराला येत असतील तर त्यांचीसुद्धा बॅग तपासली गेलीच पाहिजे, याला म्हणतात लोकशाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List