भोसरीतील आखाड्यात परिवर्तनाची नांदी; अजित गव्हाणे यांचे आमदार लांडगेंसमोर तगडे आव्हान
महापालिकेतील भ्रष्टाचार, भोसरीतील प्रत्येक कामासाठी वाढीव खर्च, दादागिरी, दडपशाहीचा विरोधकांकडून होणारा आरोप, माजी नगरसेवकांना विश्वासात न घेणे, अशा विविध कारणांमुळे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या हॅट्ट्रिकची वाट अतिशय खडतर झाली आहे.
लांडगे यांच्यापुढे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. शांत, संयमी, मितभाषी, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या हातोटीमुळे गव्हाणे यांना मतदारसंघात पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच भोसरीतील आखाड्यात या वेळेस परिवर्तन होणार का? हे 23 तारखेला स्पष्ट होईल.
पूर्वीच्या हवेली मतदारसंघातून दोन वेळा कै. गजानन बाबर आमदार झाले. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत विलास लांडे निवडून आले. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये निर्मिती झाली. पहिल्याच निवडणुकीत विलास लांडे हे अपक्ष म्हणून निवडून आले. 2014 च्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले. त्यावेळी कोणत्याच पक्षाचे तिकीट न मिळाल्यामुळे महेश लांडगे यांनी अपक्ष निवडणूक लढवत विधानसभेत प्रवेश केला. 2017 च्या महापालिका निवडणुकीच्यावेळी त्यांनी भाजपशी घरोबा करत पालिकेत सत्ता आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लांडगे यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्यावर विजय मिळवत दुसऱ्यांदा बाजी मारली. मात्र, त्यानंतर लांडगे यांच्यावर मतदारसंघातील विविध विकासकामांत टक्केवारी, वाढीव दराच्या निविदा, दडपशाही, गुंडगिरी वाढल्याचा, बगलबच्च्यांना महापालिकेतील कंत्राटे मिळवून दिल्याचा, भोसरीत बकालपणा वाढल्याचा आरोप विरोधक करत आहेत. याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार गव्हाणे यांनी वेळोवेळी आवाज उठविला.
भोसरी मतदारसंघातून 11 उमेदवार नशीब अजमावत आहेत. मात्र, यामध्ये महाविकास | आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे आणि महायुतीचे महेश लांडगे यांच्यातच दुरंगी लढत होत आहे. शहरी आणि ग्रामीण भाग असलेल्या भोसरी मतदारसंघातून दोन वेळा सहज आमदार झालेल्या लांडगे यांच्यापुढे यावेळी गव्हाणे यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे.
लांडगे यांनी आक्रमक प्रचार सुरू केल्यानंतर गव्हाणे यांनीही ‘तुतारी वाजवा, सातबारा वाचवा’, ‘आम्हाला खेळ संपवता येतो’, ‘धाकट्याला पाडले आता थोरल्याची बारी’ असे आक्रमक उत्तर दिले. त्यामुळे ऐन थंडीत भोसरीतील राजकारण कमालीचे तापल्याचे दिसून येत आहे. भोसरीचा आखाडा अतिशय रोमांचक ठरणार आहे.
Assembly election 2024 – पर्वतीत प्रस्थापितांना धक्का बसणार!
गव्हाणे यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद
भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मोठी ताकद असून कार्यकत्याँचे एक स्वतंत्र जाळे आहे. ही सर्व ताकद उमेदवार अजित गव्हाणे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी बैठक घेत पक्षातील सर्वांना जोमाने आणि ताकदीने गव्हाणे यांचे काम करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक रवी लांडगे यांच्यासह सर्व पदाधिकारी जोरदार प्रचार करीत आहेत. तसेच काँग्रेस, आपसह मित्रपक्षाचे कार्यकर्ते गव्हाणे यांच्या प्रचारात सक्रिय दिसून येत आहेत.
भोसरीत हॅट्ट्रिकची परंपरा नाही
पूर्वीच्या हवेली मतदारसंघातून दोन वेळा कै. गजानन बाबर आमदार झाले. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत विलास लांडे निवडून आले. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये निर्मिती झाली. या निवडणुकीत लांडे यांनी बाजी मारली. मात्र, 2014 च्या निवडणुकीत महेश लांडगे यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यांची हॅट्ट्रिक हुकली. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत लांडगे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. आता ते हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र, या मतदारसंघात हॅट्ट्रिकची परंपरा सातत्याने मोडीत निघत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत लांडगे यांची हॅट्ट्रिक रोखण्यात अजित गव्हाणे यांना यश येते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List