वरळी हिट अॅण्ड रन; आरोपीला अटकेची कारणे सांगणे आवश्यक नाही, हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
‘हिट अॅण्ड रन’सारख्या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी घटना स्थळावरून ताब्यात घेतले असल्यास त्याला अटकेची कारणे सांगणे आवश्यक नाही. हा मुद्दाच मुळात गौण ठरतो, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
बहुचर्चित वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणातील मुख्य मिहीर शाह व त्याचा चालक राजऋषी बडावतने त्यांच्या अटकेविरोधात याचिका केली आहे. न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर खंडपीठाने यावरील निर्णय राखून ठेवला. त्या वेळी न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. 21 नोव्हेंबर 2014 रोजी न्यायालय हा निर्णय जाहीर करणार आहे.
शाहचा दावा
अटक करताना आरोपीला अटकेची कारणे सांगणे आवश्यक आहे. तशी तरतूद कायद्यातच करण्यात आली आहे. आम्हाला अटक करते वेळी अटकेची कारणे पोलिसांनी सांगितली नाहीत. ही अटकच बेकायदा आहे, असा दावा करत आमची तत्काळ कारागृहातून सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी शाह व त्याचा चालक बडावतने याने केली आहे.
काय आहे प्रकरण
वरळी येथे जुलै महिन्यात हे हिट अॅण्ड रन प्रकरण घडले. मिहीर शाहच्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील कावेरी नाखवाला कारने फरफटत नेले. यात कावेरीचा मृत्यू झाला. तिचा पती प्रदीप जखमी झाला. ही घटना घडली तेव्हा चालक बडावत हा शाहच्या सोबत होता. घटना घडल्यानंतर शाहने तेथून पळ काढला. मिंधे गटाचा नेता राजेश शाहचा मुलगा म्हणून मिहीरला अटक करण्यात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप झाला. दोन दिवसांनी शाहला अटक झाली.
महिलेचा जीव गेला
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणात महिलेचा जीव गेला. आरोपी तेथून पळून जात असताना वांद्रे-वरळी सी-लिंकवर तो त्याचे फास्ट टॅगचे ओळखपत्र विसरला. अशा वेळी आरोपीला अटकेचे कारण सांगणे किती महत्त्वाचे आहे, या मुद्दय़ावर आम्ही सविस्तर निकाल देणार आहोत. प्रत्येक गुन्हा वेगळा असतो. तरीही तेव्हाची परिस्थिती व गुह्याची साखळी बघता अटकेचे कारण न सांगितल्याने आरोपीचा मूलभूत अधिकार बाधित होतो की नाही हे आम्ही तपासणार आहोत, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List