पुरंदरमध्ये भाजपचा शिवतारेंना विरोध
पुरंदर तालुक्यात महविकास आघाडीतून काँग्रेसचे संजय जगताप अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून, महायुतीत मात्र बिघाडी होऊन मिंधे गटाचे विजय शिवतारे व राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे दोघेही निवडणूक लढवत आहेत.
युतीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने काही दिवसांपूर्वी शिवतारे यांना पाठिंबा जाहीर केला होता, पण तालुक्यातील मूळ भाजप निष्ठावंतांनी मात्र शिवतारे यांना पाठिंबा देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तालुका भाजप माजी अध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गिरीश जगताप यांनी हा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
मागील दोन निवडणुकीत आम्ही शिवतारे यांचे प्रामाणिकपणे काम करूनही त्यांनी आमच्यावर अन्यायच केला. त्यांची स्वर्गीय गिरीश बापट यांच्यावरील टीका तसेच अजित पवार यांच्या विषयीचे यापूर्वीची वक्तव्ये यामुळे भाजपसह मित्रपक्षांना तोटाच झाला, असे गिरीश जगताप यांनी सांगितले. इतरत्र आम्ही प्रचार करणार असलो तरीही पुरंदरमध्ये शिवतारे यांचे काम करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही नवख्या मंडळींनी त्यांना साथ देण्याचे ठरवले असले तरीही निष्ठावंत कार्यकर्ते प्रचार करणार नाहीत, असे जगताप यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस भाजप माजी तालुकाध्यक्ष अशोक जोशी, सासवड शहर माजी अध्यक्ष भगवान पवार, विरेश दहीवले, मोहन भैरवकर यांसह अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List