आयुषच्या शतकाने मुंबईला सावरले
आघाडीच्या फलंदाजांच्या शरणागतीनंतर 17 वर्षीय आयुष म्हात्रेने खणखणीत शतकी खेळी करत मुंबईच्या डावाला सावरत अडीचशेच्या पलीकडे नेले. सेनादलाचा पहिला डाव 240 धावांवर आटोपल्यानंतर मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 253 अशी मजल मारत 13 धावांची छोटीशी आघाडी घेतली आहे. खेळ थांबला तेव्हा मोहित अवस्थी (14) आणि हिमांशु सिंग (7) हे खेळत होते.
काल 6 बाद 192 अशा अवस्थेत असलेल्या सेनादलाचा पहिला डाव 240 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मुंबईला सेनादलाच्या नितीन यादवने हादरवले. त्याने अंगकृष रघुवंशी (1) आणि सिद्धेश लाड (10) यांना बाद करत मुंबईची 2 बाद 29 अशी अवस्था केली. तेव्हा संकटात असलेल्या मुंबईला आयुष म्हात्रेने सावरले. दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध 176 धावांची खेळी करून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या आयुषला गेल्या चार डावात आपला खेळ दाखवता आला नव्हता. गेल्या चार डावात त्याने 15, 4, 1, 18 या अपयशी खेळ्या केल्यानंतर आज त्याने 149 चेंडूंत 116 धावांची दणदणीत खेळी करत मुंबईच्या डावाला आकार दिला. त्याने श्रेयस अय्यरसह 109 धावांची आक्रमक भागी रचली. अय्यरने फटकेबाजी करताना 46 चेंडूंत 47 धावा काढल्या. तो बाद झाल्यानंतर आयुषने आपल्या सहा सामन्यांच्या कारकीर्दीतील दुसरे शतक साजरे केले. त्याने आपल्या 116 धावांच्या आक्रमक खेळीत 12 चौकार आणि 3 षटकार लगावले. तो बाद झाल्यावर मुंबईचे तळाचे फलंदाजही लवकर बाद झाले. तरीही मुंबईने दिवसअखेर 13 धावांची छोटीशी आघाडी घेतली.
धोनीबरोबर खेळणे स्वप्न साकार होण्यासारखे
मला चेन्नई सुपर किंग्जने ट्रायलसाठी बोलावल्याने माझा उत्साह वाढला आहे. धोनीबरोबर खेळणे हे माझे स्वप्न साकार होण्यासारखेच आहे. माझी संघात निवड झाली तर माझ्यासाठी ही फार मोठी संधी असेल. पण माझी चेन्नई संघात निवड होईल की नाही हे मी आताच सांगू शकत नाही. पण जर मला चेन्नईत खेळण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच याचे सोने करीन, असा विश्वास आयुष म्हात्रेने व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List