‘राज’पुत्र मतदारांच्या दारी, अमित ठाकरे पत्नीसह प्रचाराच्या मैदानात, मतदार म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरेंच्या विरुद्ध शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता अमित ठाकरेंच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.
अमित ठाकरेंकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. अमित ठाकरे हे सध्या माहीम विधानसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत. अमित ठाकरेंसह त्यांची पत्नी मितालीह प्रचारात उतरली आहे. अमित ठाकरे हे त्यांच्या मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. यावेळी ते सर्व मतदारांच्या घरी जाऊन भेट देत आहेत. तसेच सर्व मतदारांशी संवाद साधतानाही ते दिसत आहेत. यावेळी अमित ठाकरेंनी ते कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवत आहे, त्यांच्याकडे मत मागण्यासाठी का आले आहेत, याबद्दलही सांगितले आहे.
अमित ठाकरे काय म्हणाले?
माहीम मतदारसंघात प्रचार करताना अमित ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मी माझं व्हिजन या लोकांपर्यंत मांडत आहे. ते कोणाला मतदान करणार आहेत, याबद्दलही मी लोकांना सांगत आहे. मी आता एका घरात गेलो, तेव्हा मला त्यांनी सांगितलं की असा प्रचार कधीही झालेला नाही. आमच्याकडे कोणीही आलेलं नाही. मी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही कोणाला मतदान करताय हे त्यांना समजलं पाहिजे.
मतदारसंघातील लोकंही खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. ते सेल्फी काढतात, ओवाळतात. मला शुभेच्छा देतात. मी २००९ लाही अशाप्रकारे फिरलो आहे. मला त्यांचा प्रतिसाद बघून खूपच छान वाटतंय. अनेक लोक तिकडच्या काही समस्या सांगत आहेत. यातील काही समस्या या लगेचच सोडवण्यासारख्या असतील तर त्या आम्ही लगेचच सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. माझ्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक नाही. कोणीही समोर असेल नसेल तरी मी माझा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असे अमित ठाकरेंनी म्हटले.
माहीम मतदारसंघात बाजी कोण मारणार?
दरम्यान शिवसेनेचा बालेकिल्ला अशी माहीम विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. हा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच महाविकासाआघाडीच्या ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List