निवडणूक आयोग रश्मी शुक्लांना का हटवत नाहीत? संजय राऊत यांचा परखड सवाल
राज्यात निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात निडणुका पार पडण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची गरज आहे, असे परखड मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते, त्या निलंबितही झाल्या होत्या. मात्र, देवेंद्र फडणवीस पदावर आल्यावर त्यांनी शुक्ला यांनी पुन्हा घेतले. त्यामुळे शुक्ला निःपक्षपातीपणे काम कशा करणार, असा सवालही संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रच्या पोलीस महासंचालकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. त्या निःपक्षपातीपणे काम करत नाहीत. त्या विरोधकांना त्रास देतात. राज्यातील पोलीस दल दबावाखाली काम करत आहे. त्यांना आदेश देण्याचे काम रश्मी शुक्ला करत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांवर तडीपार, हद्दपार, मकोका लावत निवडणूक ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच्या सूत्रधार राज्याच्या पोलीस महासंचलाक आणि पोलीस दल आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
या राज्यात पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे निवडणुका घ्यायच्या असतील, तर रश्मी शुक्ला यांना हटवावेच लागेल, असे आम्ही निवडणूक आयोगाला वारंवार सांगितले आहे. निवडणूक आयोग त्यांना का हटवत नाही, हेच जर आमचे सरकार असते, आणि पोलीस महासंचालकांबाबत कोणी तक्रार केली अशती तर त्यांना तातडीने हटवण्यात आले होते. आताच्या पोलीस महासंचलकांचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार बनत असताना देवेंद्र फडणवीस यांना मदत करण्यासाठी त्या आमदारांना धमकावत होत्या. आमचे फोन टॅप केले जात होते. आमच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्या निलंबित झाल्या. त्यानंतर फडणवीस पदावर येताच त्यांना पुन्हा पदावर घेतले, त्या निःपक्षपातीपणे काम करत असतील का, असा परखड सवालही संजय राऊत यांनी केला.
आजही आमचे फोन टॅप होत आहेत. राज्यातील अनेक पोलीस ठाण्यावर एकतर्फी काम करण्यासाठी त्यांचा दबाव आहे. राज्यातील अनेक मतदारंसघात आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत त्यांना तडीपार करण्यात येत आहे, अशा प्रकारे त्या दबाव टाकत आहेत. अशा पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका निःपक्ष आणि पारदर्शक होतील काय, याचा विचार निवडणूक आयोगाने करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
रश्मी शुक्ला यांच्यावर केंद्र सरकार आणि फडणवीस यांचा वरदहस्त आहे. देशात लोकशाही आहेत, लोकशाहीत काही गोष्टी पाळायच्या असतात, हे जर रश्मी शुक्ला यांना माहिती नसेल तर त्या पदावर राहण्यास योग्य नाहीत. मुळात त्यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे. राज्याच्या पोलीस महासंचलाकांच्या बाबत हे असे अशेल तर निवडणुकीत त्यांच्याकडून पक्षपातीच धोरण राबवले जाणार यात शंका नाही. त्या फडणवीस आणि भाजपसाठी काम करत असून त्यांच्याविरोधात काम करणाऱ्यांवर तडीपारी, हद्दपारी असे खोटे गुन्हे दाखल होत आहेत, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.
निवडणुकीच्या काळात दीपोत्सव साजरा करत प्रचार करण्यात येत असेल तर तो रडीचा डाव नाही का, याबाबत निवडणूक आयोगाने करावाई करण्याची गरज आहे. याआधी दीपोत्सव होत असताना निवडणुका नव्हत्या. आता निवडणुकीच्या काळात दीपोत्सवाद्वारे प्रचार करण्यात येत आहे. दीपोत्सवाला आमचा विरोध नाही. मात्र, दीपोत्सवात प्रचार होत असेल, आचारसंहितेचा भंग होत असेल तर त्यांवर आक्षेप घेणे अयोग्य नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
जनतेने ठरवले होते की लोकसभेत फडणवीस आणि त्यांच्या कंपूचा पराभव करायचा आणि ते जनतेने करून दाखवले. आता विधानसभेलाही जनतेने फडणवीस आणि कंपूचा पराभव करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. हे सर्व जनभावनेमुळे होत असते. लोकशाहीत जनभावना महत्त्वाची असते. महाराष्ट्र आणि मुंबईचे लचके ताडणाऱ्या फडणवीस आणि त्यांच्या गुजराती कंपूचा पराभव करण्याचे जनतेने ठरवले आहे, हाच आमच्या मराठी जनतेचा आत्मविश्वास आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेची मते कापण्यासाठी उभे असणाऱ्या उमेदवारांना मदत करण्याचे भाजपचे धोरण आहे. महाराष्ट्रविरोधी पक्षांना मदत करण्याचे भाजपचे राष्ट्रीय धोरण आहे. बोगस आधारकार्डद्वारे बोगस नावे मतदारयादीत घुसवत बोगस मदतान करण्याचा उपक्रम भाजपने राबवला आहे, हे अंत्यत गंभीर आहे. याची तक्रार आम्ही वारंवार केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. निवडणुका जाहीर होण्याआधी महायुतीच्या आमदारांकडे 15 ते 20 कोटी रुपये आधीच पोलीस बंदोबस्तात पोहचले आहेत. हेलिकॉप्टरनेही पैसे पोहचवण्यात आले आहे. त्यामुळे आता जे पकडण्यात येत आहे, ती रक्कम किरकोळ असल्याचे दिसून येत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List