मुद्दा – भरतीचा वांधा, तरीही मास्तरकीचा नाद सुटेना…
>> प्रा. सचिन बादल जाधव
राज्यात जून 2012 पासून शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती, परंतु तब्बल सहा वर्षांनंतर 2018 साली शिक्षकांच्या रिक्त जागांचा विचार करता महाराष्ट्र राज्य सरकारने पवित्र पोर्टलची निर्मिती करून शिक्षक अभियोग्यता चाचणीच्या आधारे शिक्षकांची पदे भरण्यास सुरुवात केली होती, पण जाचक संच मान्यतेच्या अटींमुळे अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद पडली व काही शिक्षक हे अतिरिक्त ठरल्यामुळे त्यांचे समायोजन करण्यास सुरुवात झाली आणि शिक्षक भरती रखडली गेली. राज्यात गेल्या पाच – सहा वर्षांपासून तब्बल 30 हजार शिक्षकांची पदे भरली जाणार असल्याच्या घोषणा करण्यात आल्या, पण प्रत्यक्षात मात्र केवळ 10 ते 15 हजारच शिक्षकांची भरती करण्यात येईल, असे सरकारमार्फत सांगण्यात आले.
2012 ते 2024 या कालखंडात शिक्षकी पेशात केवळ दहा ते पंधरा हजार शिक्षकांची नियुक्ती झाली. दरवर्षी किमान 50 हजारांवर विद्यार्थी शिक्षक पात्रता पूर्ण करतात. यंदा मात्र तब्बल 52 हजारांच्या वर विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचे आहे. त्यामुळे शासनाकडून अपेक्षित शिक्षक भरती होत नसतानाही विद्यार्थ्यांचा शिक्षक भरतीचा नाद सुटत नसल्याचे त्यांच्या बी.एड. व डी.एडच्या नोंदणीवरून दिसून येत आहे.
अभियोग्यता व बुद्धिमान चाचणीतील उमेदवार शिक्षक भरतीसाठी पात्र असतानाही नव्याने दुसरी अभियोग्यता व बुद्धिमान चाचणी घेण्यात आली. त्याचा निकालही जाहीर करण्यात आला. तसेच शिक्षक भरतीचे वेळापत्रक पण जाहीर करण्यात आले, परंतु का? कोणास ठाऊक, सरकारने पुन्हा एकदा शिक्षक भरती रखडून ठेवली. दरम्यान, शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेले किमान तीन लाखांहून अधिक उमेदवार हे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.
यंदा बी.एड. अभ्यासक्रमासाठी 425 महाविद्यालयांमध्ये 31 हजार 535 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी तब्बल 52 हजार 998 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर 49 हजारांच्या वर विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत. यातील 45 हजार विद्यार्थ्यांनी अर्जांची पडताळणी केली आहे, तर 35 हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम लॉक केले आहे. यामधील 6 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे एका बाजूला शिक्षक भरतीची प्रक्रिया कासवगतीने सुरू असताना दुसऱ्या बाजूला शिक्षक होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मात्र उडय़ावर उडय़ा पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. म्हणून तर म्हणावेसे वाटते की, भरतीचा वांधा, तरीही मास्तर व्हायचा नाद काही सुटेना!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List