प्रासंगिक – बहुआयामी कलाकार
>> सीमा खंडागळे
‘जवानीतील शौक म्हातारपणीच्या सवयी बनतात’. सन 1962 मध्ये प्रदर्शित ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटातील शरद तळवलकर यांनी साकारलेल्या दादूमियां या व्यक्तिरेखेच्या तोंडातील हा संवाद आहे, परंतु म्हातारपणाच्या खुणा जर तरुण वयातच दिसू लागल्या, तर एखाद्या उमद्या कलाकाराच्या जिवाची किती घालमेल होईल, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद तळवलकर.
शरद तळवलकरांना त्यांच्या तिशीतच टक्कल पडले होते. त्यामुळे त्यांना सिनेमे आणि नाटकांमध्ये वयस्कर पात्रांचे प्रस्ताव येऊ लागले. त्या वेळी ते काहीसे नाउमेद झाले होते, पण त्यांनी त्याकडे एक आव्हान म्हणून पाहिले आणि स्वतःला या भूमिकांसाठी तयार केले. वयस्कर पात्रांतही विविधता असते हे त्यांनी हेरले. प्रत्येक वृद्ध पात्राचा भूतकाळ, बोलण्याची पद्धत, सवयी वेगळ्या असतात. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या वृद्ध व्यक्तींचे रोज निरीक्षण करायला सुरुवात केली. त्या वृद्ध व्यक्तींची शरीराची लकब, बोलण्याची ढब त्यांनी आपल्या पात्रांमध्ये वापरण्यास सुरुवात केली. त्यातूनच मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला त्यांनी अविस्मरणीय पात्रे दिली.
शरद तळवलकर यांच्या अभिनयाची सुरुवात शालेय जीवनातच झाली. 1935 साली शाळेत सादर झालेल्या ‘रणदुंदुभी’ नाटकात त्यांनी शिशुपालाची भूमिका साकारली. या भूमिकेमुळे त्यांना अभिनयाची गोडी लागली. त्यांनी प्रभात फिल्म्समध्ये एक एक्स्ट्रा कलाकार म्हणूनसुद्धा काम केले. त्याच सुमारास त्यांना पुण्यातील नाट्यविकास नाटक कंपनीत कामाची संधी मिळाली, पण त्यांच्या वडिलांना त्यांचा अभिनयातील प्रवास मान्य नव्हता. म्हणून त्यांना घर सोडावे लागले. पुढे काही काळातच नाट्यविकास कंपनी दिवाळखोरीत गेली आणि त्यांनी नाटक सोडण्याचा निश्चय केला, परंतु पुढे पुण्यातील एस.पी. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ते पुन्हा रंगभूमीवर परतले.
त्यानंतर विनोदी तसेच गंभीर भूमिकांतून त्यांनी रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. त्यांच्या अभिनयातील सहजता, संवादफेक आणि विनोदाची खास शैली यामुळे ते प्रेक्षकप्रिय झाले. ‘संशयकल्लोळ’मधील फाल्गुनराव, ‘लग्नाची बेडी’मधील गोकर्ण आणि ‘अपराध मीच केला’मधील गोळे मास्तर या त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘धाकटी सून’, ‘लेक चालली सासरला’, ‘कैवारी’, ‘एकटी’ आणि ‘धूमधडाका’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लक्षात राहणाऱ्या ठरल्या. तसेच ‘रसरंग’ या नियतकालिकात ‘प्रश्न तुमचे, उत्तर शरद तळवलकरांचे’ हे सदर संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत लोकप्रिय असे होते. आज 1 नोव्हेंबर, शरद तळवलकर यांची 106 वी जयंती.
(लेखिका जनसंपर्क व सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत आहेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List