महायुतीमध्ये बंडाचे लोण; मनधरणी सुरू, विधान परिषद आणि महामंडळाचे गाजर
विधानसभा निवडणुकीत महायुतीमधून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने मिंधे गट आणि भाजपधील नाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. या बंडखोरांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी त्यांची मनधरणी सुरू झाली आहे. या बंडखोरांचे बंड थंड करण्यासाठी विधान परिषद, राज्यसभेचे सदस्यत्व आणि शासकीय महामंडळांवर वर्णी लावण्याचे आश्वासन दिले जात आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण 7 हजार 995 उमेदवारांचे 10 हजार 905 अर्ज दाखल झाले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीत बंडखोरांना शांत करण्याबाबत चर्चा झाली आणि बंडखोरांना विविध पदांचे गाजर दाखवले आहे. बोरिवलीतून पक्षाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार संजय उपाध्याय यांची अडचण झाली आहे. त्याचा मोठा फटका भाजपला बसणार आहे.
अंधेरी पूर्वमधून शिंदे गटाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याने माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा यांनी बंडाचे निशाण हाती घेतले आहे. तर भायखळा येथून काँग्रेस नेते मधू चव्हाण यांनी बंडखोरी केली आहे.
मालाडमध्ये भाजपात बंडखोरी
मालाडमध्ये भाजपच्या विनोद शेलार यांच्या विरोधात भाजप बंडखोर ब्रिजेश सिंह यांनी अर्ज भरला आहे. मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात महायुतीच्या गीता जैन पुन्हा अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या आहेत. याशिवाय बेलापूर, वांद्रे पूर्वमध्ये शिंदे गटाचे अनुक्रमे विजय नहाटा, कुणाल सरमळकर यांनी बंडखोरी केली आहे.
समीर यांना भुजबळांचे ‘बळ’
नंदुरबार जिह्यातील अक्कलकुवा मतदारसंघातून भाजपच्या माजी खासदार हीना गावित यांनी बंडखोरी केली आहे. शिंदे गटाने विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. नाशिक जिह्यातील नांदगाव मतदारसंघात शिंदे गटाच्या सुहास कांदे यांच्या विरोधात समीर भुजबळ मैदानात उतरले आहेत. समीर भुजबळ अजित पवार गटाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवत असले तरी त्यांना काका छगन भुजबळ यांचे पूर्ण पाठबळ आहे.
वाईमध्ये अजित पवार गटाच्या मकरंद पाटील यांना शिंदे गटाच्या पुरुषोत्तम जाधव यांनी आव्हान दिले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या परंपरागत शिर्डी मतदारसंघातून बंडखोरी करणाऱ्या राजेंद्र पिपाडा यांना आज भाजपच्या नेत्यांनी मुंबईत बोलवून त्यांच्याशी चर्चा केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List