ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ
आधुनिक युगात सर्वच बाबी ऑनलाइन झाल्या आहेत. नागरिक घरबसल्या मोठमोठ्या वस्तूंची खरेदी करतात. प्रशासनातही ऑनलाइनला भलतेच महत्त्व प्राप्त झाले. मात्र, निवडणूक आयोगाने ऑनलाइन नामांकन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही उमेदवारांनी त्याकडे पाठ फिरविल्याची प्रचीती येत आहे.
निवडणूक आयोगाने हायटेक पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यानुसार, उमेदवारांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येतो. यापूर्वीच्या लोकसभा आणि त्यापूर्वीच्या अनेक निवडणुकीत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभेल, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरल्याची प्रचीती येत आहे. आतापर्यंतच्या अनेक निवडणुकीमध्ये ऑनलाइन नामांकनाला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात नामांकन अर्ज दाखल करण्यावरच सर्व उमेदवारांचा जोर दिसत आहे. त्यामुळे ही अत्याधुनिक सुविधा कुचकामी ठरल्याचे बोलले जात आहे.
पूर्वीपासून सर्वच पक्षीय व अपक्ष उमेदवारांमध्ये वाजत-गाजत जाऊन अर्ज भरण्याची परंपरा आहे. यातून पक्ष आणि उमेदवार आपले शक्तिप्रदर्शन करतात. अर्ज भरताना सोबत किती कार्यकर्ते आहेत, यावरून त्यांचे निवडणुकीचे गणित लावले जाते. त्यासाठी उमेदवार मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जमवाजमव करून मिरवणुकीने अर्ज भरण्यासाठी जातात. तोच पायंडा अद्यापही कायम आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुविधा उपलब्ध करून देऊनही उमेदवार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हल्ली निवडणुकीत अनेक उच्चशिक्षितही उमेदवार म्हणून उभे ठाकतात. मात्र, अशा उमेदवारांनीही ऑनलाइन नामांकनाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघांतून एकाही उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरला नाही.
वाजतगाजत जाण्याकडेच सर्व उमेदवारांचा कल
■ ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची हार्डकॉपी (प्रिंटआऊट) संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते. त्यावेळी संबंधित उमेदवाराला शपथ घ्यावी लागते. या प्रक्रियेत उमेदवाराचा वेळ वाचतो. प्रशासनालाही सुविधा होते. मात्र, उमेदवार प्रत्यक्ष अर्ज भरत असल्याने ऑनलाइन नामांकन कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List