वैभव नाईक यांनी भरला उमेदवारी अर्ज, शिवसेना आणि महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांनी गुरूवारी दुपारी कुडाळ येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे दाखल केला. येथील अनंत मुक्ताई हॉल ते प्रांताधिकारी कार्यालय अशी महाविकास आघाडीने भव्य रॅली काढून लक्षवेधी शक्तिप्रदर्शन केले. रखरखत्या उन्हात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते. आमदार वैभव नाईक यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी महाविकास आघाडीने कुडाळात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कुडाळ येथील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणात महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संबोधित केले. त्यानंतर सभा स्थळ ते गांधीचौक मार्गे प्रांताधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार आमदार वैभव नाईक यांनी नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. तसेच ज्येष्ठ मंडळींचे आशिर्वाद घेतले.
यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी आमदार परशुराम उपरकर, जि.प.चे माजी अध्यक्ष सतीश सावंत, संग्राम प्रभगावकर, शिवसेना उपनेत्या तथा महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, भाई गोवेकर, सौ.स्नेहा वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट व सुशांत नाईक, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर परब, विजय प्रभू, नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, तालुकाप्रमुख योगेश धुरी, नगरसेवक उदय मांजरेकर, श्रेया गवंडे, सई काळप, श्रुती वर्दम, शिल्पा खोत, निनाक्षी शिंदे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, बाळा कोरगावकर, दिपक गावडे, राजेश टंगसाळी, शेखर गावडे, मंजू फडके, अनंत पाटकर आदींसह शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीने जाऊन निवडणुक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List