मुलुंड रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम रखडले, दीड वर्षात केवळ 25 टक्के काम पूर्ण; नागरिकांची प्रचंड गैरसोय
मुलुंड रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेला बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचे काम रखडले आहे. दीड वर्षापूर्वी जुना धोकादायक पूल तोडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरू झाले. परंतु दीड वर्षात केवळ 25 टक्केच काम पूर्ण झाले असून पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या पुलाचा वापर करणाऱ्या शाळकरी मुलांचे आणि स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांना ठाण्याच्या दिशेकडील पुलावरून ये-जा करावी लागत आहे. या पुलाचे लवकराच लवकर बांधकाम पूर्ण करावे आणि स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी रेल्वेच्या प्रवाशी संघटनांनीही केली आहे.
पुलाचे काम रखडल्या प्रकरणी शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख प्रमोद धुरी यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावर पादचारी पुलाचे काम सुरू आहे. पुलाचे काम 25 टक्के पूर्ण झाले असून 30 जून 2025पर्यंत काम पूर्ण होईल, असे उत्तर देण्यात आले. म्हणजेच आणखी आठ महिने काम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. काम रखडल्यामुळे पुलावर अक्षरशः गवत उगवले असून सर्वत्र घाण आणि कचरा पसरल्याचे चित्र आहे. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रमोद धुरी यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
पूर्वेकडे असलेल्या लिफ्टचेही काम रखडले आहे. दिव्यांग, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही लिफ्ट फायदेशीर ठरेल. या लिफ्टच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांमध्ये उतरता येते. या लिफ्टचे कामही वेगाने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
रेल्वे पुलांचा वापर करण्याची मागणी
गेल्या दीड वर्षात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवादरम्यान स्थानिक नागरिकांना रेल्वे पुलाचा वापर करावा लागला. मात्र रेल्वे पूल असल्याने प्लॅटफॉर्म तिकीट अनिवार्य. त्यामुळे स्थानिक नागरिक, शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागला. आता दिवाळीपासून पुढे पादचारी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत इतर रेल्वे पुलांचा मुक्त वापर करता येईल, अशी सूचना रेल्वे प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी प्रमोद धुरी आणि स्थानिक नागरिकांनी रल्वे प्रशासनाकडे केली आहे. हा पूल मुंबई महापालिका रेल्वेच्या खर्चातून बांधत आहे. त्यामुळे महापालिकेनेही ही बाब गांभीर्याने घ्यावी याकडेही स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List