मुलगी ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपलने थेट दिला नकार; कारण ऐकून व्हाल थक्क!
अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना सहसा फोटोग्राफर्स किंवा पापाराझींसमोर येत नाहीत. मात्र मुंबईतील नुकत्याच एका कार्यक्रमात या दोघींना एकत्र पाहिलं गेलं. बुधवारी मुंबईत एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी अभिनेता अक्षय कुमार त्याची पत्नी ट्विंकलसोबत पोहोचला होता. याच ठिकाणी अक्षयची सासू आणि ट्विंकलची आई डिंपल कपाडियासुद्धा होती. यावेळचा डिंपलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. यामागचं कारण म्हणजे डिंपलने पापाराझींसमोर थेट मुलीसोबत फोटो क्लिक करण्यास नकार दिला. इतकंच नव्हे तर “मी ज्युनिअर्ससोबत पोझ देत नाही,” असं तिने म्हटलं.
चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडल्यानंतर तिथून बाहेर निघताना आधी डिंपल कॅमेरासमोर पोझ देताना दिसते. त्याचवेळी तिच्या मागून मुलगी ट्विंकल येत असते. तेव्हा पापाराझी डिंपलकडे विनंती करतात की मुलीसोबत फोटोसाठी पोझ द्या. तेव्हा त्यांना स्पष्ट नकार देत डिंपल म्हणते, “नाही नाही, मी ज्युनिअर्ससोबत पोझ देत नाही, फक्त सिनिअर्स.” डिंपलचा हा व्हिडीओ पापाराझी अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. स्वत:च्याच मुलीसोबत फोटोसाठी पोझ द्यायला का नकार दिला, असा प्रश्न काहींनी विचारला. तर मुलीलाच ज्युनिअर का म्हटलं, असाही प्रश्न काहींना पडला आहे.
‘गो नॉनी गो’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी डिंपल, ट्विंकल आणि अक्षय पोहोचले होते. या चित्रपटाची निर्मिती खुद्द ट्विंकलनेच केली असून त्यात डिंपलने भूमिका साकारली आहे. डिंपलसोबतच यात मानव कौल आणि अथिया शेट्टी यांच्याही भूमिका आहेत.
याआधीही अनेकदा डिंपलने सार्वजनिक कार्यक्रमात ट्विंकलची मस्करी केल्याचं पहायला मिळालं होतं. चित्रपटांपासून दूर गेलेली ट्विंकल लिखाणाच्या क्षेत्रात चांगलं नाव कमावतेय. तिने काही पुस्तकंसुद्धा लिहिली आहेत. तिच्याच एका पुस्तक प्रकाशनादरम्यान बोलताना डिंपलने ट्विंकलची अनेक गुपितं उलगडली होती. डिंपलने अक्षय आणि ट्विंकलच्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित सिक्रेट्स सांगण्यास सुरुवात करताच अक्षयने मागून येऊन त्यांच्या हातातील माईक बंद केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List