आभाळमाया – ‘मिनी’ मून!

आभाळमाया – ‘मिनी’ मून!

एक ‘हंगामी’ चंद्र सध्या पृथ्वीभोवती फिरतोय. म्हणजे तो दरवर्षी येणारा आहे असं नाही, पण सध्या तो ‘टेम्पररी’ किंवा अवकाशीय ‘हंगामी’ नेमणुकीवर आहे. आता तुम्ही म्हणाल ही प्रशासकीय भाषा तिकडे अंतराळात कुठे पोहोचली, पण धूमकेतूसुद्धा केव्हातरी ‘डेप्युटेशन’वर येतातच की! त्यांचं काम म्हणजे सौरमालेत गगरून परत जातात, परंतु आपल्या या भेटीचा ‘ठसा’ ते मागे सोडलेल्या धूळ, दगडगोट्य़ांमुळे ठेवतातच. एखाद्या धूमकेतूने असा ‘ठेवा’ मोठय़ा प्रमाणात ठेवला तर प्रतिवर्षी ठरावीक तारखांना, ठरावीक राशींच्या पार्श्वभूमीवर रात्री आपल्याला सुंदरसा उल्का वर्षाव दिसू शकतो. असाच प्रसिद्ध ‘लिओनिड मिटिअर शॉवर’ किंवा सिंह राशीतला उल्का वर्षाव दिवाळीनंतर दिसणार आहे. 16 ते 18 नोव्हेंबरच्या काळात तो कसा दिसेल याची माहिती त्याच्या आधीच्या आठवडय़ात घेऊ. हा उल्का वर्षाव उत्तम दिसला तर ती दिवाळीनंतरची वैश्विक दिवाळीच असेल!

आता गोष्ट चंद्राची. चांद्रअभ्यासाचे अनेक पैलू आहेत ते आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्राबद्दलचे. त्याचा एक तुकडा त्याच्या जन्माच्या वेळीच तुटून अंतराळात दूर फेकला गेला या ‘चन्क’ला (उगाचच) दुसरा चंद्र म्हणतात. वास्तविक तो केवळ छोटासा ‘चंद्रांश’ आहे असं म्हणायला हवं.

मग हा नवाच ‘मिनी’ किंवा चिमुकला चंद्र कुठला आणि तो पृथ्वीभोवती कधीपासून फिरतोय? तसा आपल्या चंद्राचा नि त्या ‘मिनी’ चंद्राचा काहीही संबंध नाही. तो एक छोटा अवकाशीय (अशनी पाषाण) आहे. मात्र त्याच्या भ्रमंतीत तो काही काळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीभोवती फिरत राहणार असल्याने त्याला ‘मिनी’ चंद्र असं नाव पडलंय.

या ‘मिनी मून’ची लांबी अवघी 11 मीटर किंवा 36 फूट आहे. त्याचा शोध दक्षिण आफ्रिकेतल्या वेधशाळेला 7 ऑगस्ट 2024 रोजी लागला. तो पृथ्वीपासून 5 लाख 68 हजार 500 किलोमीटरवरून पृथ्वीची परिक्रमा करायला लागण्यापूर्वी सूर्याभोवती फिरून आलाय. म्हणजे तसा तो सौर प्रवासीच आहे. या भ्रमंतीत तो गेल्या 29 सप्टेंबरला म्हणजे नुकताच पृथ्वीला परिक्रमा करू लागलाय. ही त्याची परिक्रमा 1 महिना आणि 27 दिवसांची असेल. 25 नोव्हेंबरला त्याचं हे फिरणं संपेल आणि पृथ्वी भेट आटोपती घेऊन तो आपल्या पुढच्या प्रवासाला लागेल. इथून तो जवळपास 15 कोटी किलोमीटरवरील पृथ्वीच्या ‘हिल स्फिअर’पर्यंत जाईल. त्याचा वेग बराच कमी म्हणजे सेकंदाला 0 पूर्णांक 439 कि.मी. (0.439) इतकाच आहे.

हा केवळ 11 मीटर लांबीचा अशनी पृथ्वीसाठी धोकादायक नाही. कारण तो चंद्र-पृथ्वीच्या सरासरी अंतराच्याही पलीकडून जात आहे. त्याचं वैज्ञानिक नाव पीटी-5 असं आहे.

हा मिनी मून ‘निअर अर्थ ऑब्जेक्टस्’ अथवा पृथ्वीनिकट अशनींपैकीच असून तो ‘अपोलो’ प्रकारातला आहे. याचा अर्थ असा की, जे धूमकेतू किंवा अशनी पृथ्वी आणि सूर्यातील या 15 कोटी किलोमीटर अंतराच्या ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट किंवा ‘एयू’ यालाच म्हणतात. त्याचेही अंतरावरून काही गट पाडले असून पृथ्वीनिकट अशनींबाबत तेच परिमाण समजले जाते.

यापैकी ऍटेन्स गटात पृथ्वी-सूर्य अंतरापेक्षा कमी म्हणजे 0.983 (15 कोटींपेक्षा कमी) अंतरावर असणारे धूमकेतू किंवा अशनी ‘अपोलो’ प्रकारात पृथ्वी-सूर्य अंतरापेक्षा अधिक म्हणजे 1 एयू ते 1.017 एयू या अंतराळी परिसरात फिरणारे.  ऍमॉर्स म्हणजे 1 ते 1.3 एयू अंतरावरील अशा भ्रमणकक्षांमधले अशनी, धूमकेतू असतात. चौथा गट ऑटिरॅस. पृथ्वीला अतिनिकट असलेले लघुग्रह म्हणजे बेनू 29075, 1950 डीए, 2023 टीएल 4, 2007 एफटी 3 आणि 1979 एक्सबी हे पाच लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक असून ‘नासा’ त्यांचा अभ्यास करून संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न करत आहे.

यासाठीचाच अभ्यास करणाऱ्या पथकांनी वेळोवेळी येणाऱ्या फिरस्त्या लघुग्रहांची आणि अशनींची माहिती गोळा केली असून त्यांचा वेळीच ‘बंदोबस्त’ करण्यासाठी ‘ओसिरिस’ या अशनीवरची ‘सँपल’सुद्धा आणली आहेत. यातून अशा अशनींची संरचना समजू शकते आणि तो पृथ्वीला खूपच धोकादायक असला तर त्याचे तुकडे करण्यासाठी ‘इम्पॅक्ट’ यान पाठवता येते किंवा त्याची दिशा बदलता येते.

असाच यशस्वी प्रयोग ‘डायमॉर्फोस’ या जुळ्या अशनीबाबत ‘नासा’ने केला होता. त्यासाठी ‘डबल ऍस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट’ किंवा ‘डार्ट’ असं नाव या ‘इम्पॅक्ट’ (धडक) मोहिमेला देण्यात आलं आणि ‘डायमॉफोर्स’ची दिशा वळवण्यात ‘डार्ट’ यशस्वी ठरलं!

त्यामुळे वाढत्या खगोलीय तंत्रज्ञानाच्या मदतीने कदाचित अवकाशी संकटापासून आपला ग्रह आपल्याला वाचवता येईल. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जशा एका विशाल अशनीपाताने डायनोसॉरचा विनाश झाला, तसा आताच्या पृथ्वीवासीयांचा होऊ नये याची काळजी अंतराळ वैज्ञानिकांना आहे. मात्र तशीच पृथ्वीवर राहणाऱ्या आणि भीषण युद्ध तसंच संहारक शस्त्रास्त्र बनवणाऱ्या ‘सूज्ञ’ मानवांना आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बाकी ‘छोटा चंद्र’ पृथ्वीला फेरी मारून जाईल. अर्थातच तो अतिलहान असल्याने नुसत्या डोळय़ांनी दिसणार नाही. शक्तिशाली दुर्बिणीतून दिसू शकेल.

वैश्विक  

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान, आता सदाभाऊंची राष्ट्रवादीवर सडकून टीका आधी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान, आता सदाभाऊंची राष्ट्रवादीवर सडकून टीका
महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांचं आजारपण आणि शारिरिक व्यंगावर टीका केली. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण...
सलमान खाननंतर बॉलिवूडच्या आणखी एका मोठ्या सुपरस्टारला जीवे मारण्याची धमकी
‘आई कुठे काय करते’ मधील अनिरुद्ध साकारताना…; मिलिंद गवळींनी व्यक्त केली मनातील खंत
भारतीय निर्मातीने विकत घेतलं Friends फेम मॅथ्यू पेरीचं घर; हिंदू पद्धतीनुसार केली पूजा
Aishwarya Rai – Abhishek Bachchan : ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मोठी अपडेट, दोघं पुन्हा एकत्र येणार ?
बस चालवता, चालवता ड्रायव्हर अचानक हार्ट अटॅकने कोसळला, मग…VIDEO
अजित पवारांचा भाजपला ठेंगा, नवाब मलिक यांचा प्रचार करणार!