मुंबईसोबतच ठाण्यात उष्णलाट, विदर्भावर सूर्य कोपला, पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाचा काय इशारा?
Maharashtra Heatwave : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने मुंबईसोबतच ठाण्यात उष्णलाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्ण आणि दमट वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबई- ठाण्यात तापमान वाढले
मुंबईसह ठाणे शहराचे बाढते तापमान शहराला उष्णलाटेकडे घेऊन जात असल्याचे दिसत आहे. ठाण्याचा पारा आज विक्रमी ४२ अंशांवर पारा पोहोचला. यामुळे ठाणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. आरोग्य विभाग उष्माघाताकडे लक्ष ठेवून आहे. तीन दिवसांपासून तापमान एका एका अंशाने वाढत आहे. सोमवारपर्यंत हा पारा तीन अंशांनी वाढून ४२ अंशावर वर पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत हे तापमान आणखी वाढू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
विदर्भात उच्चांकी तापमान
विदर्भावर सूर्य कोपला आहे. अकोल्याचे कमाल तापमान 44 अंशावर पोहोचले आहे. तापमानात सरासरीपेक्षा चार अंशांनी वाढ झाली आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान 44.2 अंश अकोला शहरात नोंदवले गेले. आता पुढील दोन दिवस विदर्भात उष्ण लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरीमध्ये 43.8, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये 43.6° तर नागपुरात 42.4 वाशीम 42.2, वर्धा 42.4, यवतमाळ 42 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
का वाढत आहे तापमान
बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे राज्यात तापमानात वाढ होत आहे. मध्य भारत, उत्तर-पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे चक्कर येणे, डोके दुखणे, दम लागणे अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारी गरजेशिवाय बाहेर पडू नये, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. राज्यभरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताकरिता विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List