कसं शिकायचं! शाळांच्या फीमध्ये 80 टक्क्यांपर्यंत वाढ
देशभरातील खासगी शाळांमधील फी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिल्लीस्थित ‘लोकलसर्कल’ नावाच्या संस्थेच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. गेल्या तीन वर्षांत खासगी शाळांनी त्यांच्या फीमध्ये तब्बल 50 ते 80 टक्के वाढ केली. केवळ खासगी शाळेत आपल्या पाल्याला उत्तम शिक्षण मिळेल हा भ्रम अनेकांच्या मनात असतो. मात्र फी वाढीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत.
सर्वेक्षणात देशभरातील 300 हून अधिक जिह्यांमधील 85 हजारांहून अधिक पालकांची मते घेण्यात आली. बहुतेक खासगी शाळा दरवर्षी 10 ते 15 टक्के फी वाढवतात, असा धक्कादायक खुलासा सर्वेक्षणातून झाला. विशेष म्हणजे अनेक शाळांनी इमारत शुल्क, तंत्रज्ञान शुल्क आणि देखभाल शुल्क असे नवीन खर्च पालकांकडून वसूल केले. यापूर्वी असे शुल्क कधीच आकारले जात नव्हते. शाळांच्या सुविधांमध्ये कोणतीही लक्षणीय सुधारणा झालेली नाही. शिक्षणाच्या गुणवत्तेतही कोणताही बदल झालेला नाही. 42 टक्के पालकांच्या म्हणण्यानुसार शाळांमधील फी 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे, तर 26 टक्के पालकांनी ही फी 80 टक्क्यांपर्यंत वाढली असल्याचे सांगितले.
सरकारचे नियम पायदळी
बहुतेक शाळांनी खासगी वाहतूक, डिजिटल शिक्षण आणि इतर अतिरिक्त सेवांसाठी स्वतंत्रपणे शुल्क आकारल्याने फीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोनानंतर ऑनलाइन शिक्षण सक्तीचे करण्यात आले. मात्र सध्या अनेक शाळा याकडे आपल्या नफ्याचे साधन म्हणून पाहत आहेत, असेही सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. सरकारने भरमसाट फीला आळा घालण्यासाठी काही नियम बनवले आहेत, परंतु प्रत्यक्षात हे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List