वाढत्या वयात दृष्टी होऊ शकते कमकुवत, ‘या’ सवयी करा फॉलो
आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच बदलती जीवनशैली यांचा परिणाम आरोग्याप्रमाणेच डोळ्यांच्या दृष्टीवरही वाढत्या वयाप्रमाणे होत असतो. कारण आपण पाहतोच की आजच्या पिढीत मुलांनाही चष्म्याची गरज भासू लागली आहे. लहान वयातच त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होताना दिसत आहे. कारण आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक सवयींमुळे आपल्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. अशावेळेस पनवेल येथील आर.जे शंकरा आय हॉस्पिटलमधील ग्लूकोमा कन्सल्टंट डॉ. रोशन कोलाको यांनी सांगितले की, जर डोळ्यांची नियमित काळजी घेतली तर वाढत्या वयातही दृष्टी खराब होणार नाही. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे कसे फायदेशीर ठरेल, याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
निरोगी आहार
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन ए, सी, ई आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा. गाजर, पालक, संत्री आणि सुकामेवा यांच्या सेवनाने वाढत्या वयात मोतीबिंदूचा धोका कमी होतो. वयाच्या 30 व्या वर्षानंतर, तुमच्या आहारात या गोष्टींचा नक्कीच समावेश करा.
स्क्रीनवरून ब्रेक घ्या
सतत फोन, संगणक आणि टेलिव्हिजनवर काम केल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो. तज्ञ सांगतात की काही काळ स्क्रीनपासून ब्रेक घ्या. 20-20-20 नियम पाळा. म्हणजे दर 20 मिनिटांनी, 20 फूट अंतरावर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पहा जेणेकरून तुमच्या डोळ्यांना विश्रांती मिळेल.
सनग्लासेस घाला
सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे मोतीबिंदू आणि डोळ्यांचा कर्करोग होऊ शकतो. म्हणून, 100% UV संरक्षण असलेले सनग्लासेस घालणे आवश्यक आहे. सनग्लासेस घालल्याने डोळ्यांना थेट सूर्यप्रकाशाच्या अतिनील किरणांपासून संरक्षण मिळते.
हायड्रेटेड रहा
शरीरात पाण्याची कमतरता असली तरी तुमचे डोळे कोरडे पडू शकतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, दिवसातून आठ ग्लास पाणी प्या. हायड्रेशनसाठी, तुम्ही तुमच्या आहारात काकडी आणि टरबूज सारख्या गोष्टींचा समावेश करू शकता.
नियमित डोळ्यांची तपासणी करा
ग्लूकोमा आणि मधुमेही रेटिनोपॅथी सारख्या डोळ्यांच्या अनेक आजारांमध्ये सुरुवातीची लक्षणे दिसून येत नाहीत. यासाठी प्रौढांनी दर एक ते दोन वर्षांनी त्यांचे डोळे तपासले पाहिजेत. तर मुले आणि वृद्धांनी वर्षातून एकदा नक्कीच डोळे तपासले पाहिजेत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List