“प्रत्येक घटस्फोटात तिसरी व्यक्ती..”; मराठमोळ्या अभिनेत्रीशी विभक्त झाल्यानंतर पूर्व पतीची नेटकऱ्यांना विनंती
‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मुग्धा चाफेकर लग्नाच्या नऊ वर्षांनंतर पती रवीश देसाईशी विभक्त झाली. या दोघांनी डिसेंबर 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती. रवीशने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली होती. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यापैकी काहींनी मुग्धा आणि रवीशच्या घटस्फोटासाठी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर कारणीभूत असल्याचं म्हटलं. त्यावर आता रवीशने व्हिडीओ पोस्ट करत टीकाकारांना सुनावलं आहे. एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेवर का बोट ठेवावं, असा सवाल त्याने नेटकऱ्यांना केला आहे.
या व्हिडीओमध्ये रवीश म्हणाला, “प्रत्येक घटस्फोटात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग असणं गरजेचं आहे का? दोन लोकांनी एकमेकांच्या सहमतीने एकत्र यायचं ठरवलं आणि आता सहमतीने विभक्त होत आहेत. हे इतकं सोपं का असू शकत नाही? त्यामागे काहीही कारण का असेना, ते आमच्या मनातच राहू द्या. कृपया आम्हाला थोडीतरी प्रायव्हसी द्या. महिलेच्या प्रतिष्ठेवर का बोट ठेवावं आणि कशासाठी? यातून तुम्ही काय साध्य करणार आहात?”
“हे पहा.. आम्ही खूप साधी माणसं आहोत. सोशल मीडियावर कोणाशीही भांडायचा माझा हेतू नाही. आमचं व्यक्तीमत्त्व निर्माण करण्यासाठी आम्हाला संपूर्ण आयुष्य लागतं. मी विनंती करतो, कृपया एकमेकांशी दयेनं वागुयात. इतकं तरी आपण एकमेकांसाठी करू शकतो. सोशल मीडियावर असंही खूप काही सुरू असतं. लोक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कोणत्या समस्यांचा सामना करतात, याविषयी बरीच जागरूकता निर्माण केली जाते. त्यामुळे लोकांच्या समस्येत आणखी भर का घालावी? किमान प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही मायेनं आणि आदरानं वागण्याचा प्रयत्न नक्की करू शकता. ही विनंती आहे. आमच्या खासगी आयुष्यापासून लांब राहा आणि आम्हाला प्रायव्हसी द्या”, अशी विनंती त्याने नेटकऱ्यांना केली आहे.
मुग्धा आणि रवीश हे 2014 मध्ये ‘सतरंगी ससुराल’ या मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. या मालिकेत एकत्र काम करताना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मुग्धा आणि रवीशने 30 जानेवारी 2016 रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर त्याच वर्षी 16 डिसेंबर रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List