धारावीत डीएसएमचा अनोखा उपक्रम, दोन महिलांसह 11 जणांना एमजीएल कंपनीत थेट नोकरी
धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचा (DRPPL) एक उपक्रम असलेल्या धारावी सोशल मिशनने (DSM) ‘डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (डीबीआयटीआय) च्या सहकार्याने धारावीतील युवकांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते. या उपक्रमात ‘गॅस पाईपलाईन फिटर’ चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या धारावीतील 11 जणांना थेट महानगर गॅस लिमिटेडमध्ये (एमजीएल) कायम स्वरुपाची नोकरी मिळाली आहे. विशेष म्हणजे यात 2 महिलांचाही समावेश आहे.
डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या काळात डीएसएमने धारावीकरांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन केले होते. या 2 महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान एकूण 21 प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिकांसह थेट इंडस्ट्रियल ट्रेनिंगची संधी मिळाली. या प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थींना 5000 रुपयांचे मासिक विद्यावेतनही देण्यात आले, तर एमजीएलमध्ये रुजू झालेल्या यशस्वी उमेदवारांना 15,000 मासिक वेतन मिळणार आहे.
धारावीकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी डीएसएमच्या माध्यमातून नेहमीच नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत.यात कौशल्य विकास यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून एमजीएलमध्ये नोकरी मिळवलेल्या सोनाली रमेश हीने डीएसएमचे आभार मानले आहेत. गॅस पाईपलाईन फिटिंगच्या क्षेत्रात काम करण्याचा कधी विचारही केला नव्हता. मात्र या अभ्यासक्रमाने मला वेगळा आत्मविश्वास दिला आहे. त्यामुळेच मी ही नोकरी मिळवू शकले. या क्षेत्रात अधिकाधिक महिलांनी देखील यायला हवे अशा शब्दांत सोनालीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“या अभ्यासक्रमाने माझ्या जीवनाला वेगळे वळण दिले आहे, भविष्यात नेमकं काय करायचं? हा प्रश्न मला आणि माझ्या मित्रांना नेहमीच भेडसावत होता. पण आता आमच्याकडे कौशल्य आहे आणि हातात नोकरी देखील आहे. याचे संपूर्ण श्रेय डीएसएमला आहे असे हानीफ असलम शेख याने म्हटले आहे.
“धारावी सोशल मिशनच्या माध्यमातून धारावीकरांसाठी नेहमीच नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. धारावीतील तरुण-तरुणींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा आमचा मानस आहे. धारावीकरांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे डीएसएमच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
धारावीतील तरुणांच्या कौशल्याचे कौतुक महानगर गॅस कंपनीने केले आले. “धारावीतील तरुण-तरुणी मेहनती आणि हुशार आहेत. आमच्या कंपनीत त्यांचे स्वागत आहे. मिळालेल्या संधीचे ते सोने करतील याची मला खात्री आहे. धारावी सोशल मिशनच्या सहकार्याने भविष्यात जास्तीत जास्त धारावीकरांना रोजगाराची संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करू” अशी प्रतिक्रिया महानगर गॅस कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List