वेब न्यूज – मुकाब
>> स्पायडरमॅन
तेलाच्या व्यापारावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि इतर उद्योगांना प्राधान्य देण्यासाठी सौदी अरब गेली काही वर्षे प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून सौदी अरबच्या रियाधमध्ये ‘न्यू मुरब्बा’ या प्रोजेक्टच्या अंतर्गत जगातील सर्वात मोठी इमारत ‘मुकाब’चे काम हाती घेण्यात आलेले आहे. मुकाब ही इमारत संपूर्णपणे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर (साय-फाय) आधारित असणार आहे. ही इमारत म्हणजे एक संपूर्ण शहर असेल अशी तिची रचना करण्यात येणार आहे. एखाद्या चौकोनी ठोकळ्याच्या आकाराची ही इमारत 1300 फूट उंच आणि सोन्याच्या रंगासारखी झळाळती असणार आहे. बांधकाम क्षेत्रात ही इमारत एक नव्या यशाचे शिखर गाठणारी आणि नव्या तंत्रज्ञानाला चालना देणारी असेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कटिंग एज तंत्रज्ञानाचा वापर करून तिला अत्याधुनिक आणि अधिक आरामदायी बनवले जाणार आहे. इमारतीच्या बाहेरील दर्शनी भागात व्हर्चुअल रिऑलिटी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून त्यामुळे लोकांना 3 डीपेक्षा जास्त व्हर्चुअल रिऑलिटीचा अनुभव घेता येणार आहे. इमारतीच्या इंटेरियरसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून त्याच्या मदतीने होलोग्राफिक इमेजेसचा आनंद घेता येणार आहे. मुकाब हे एक स्वयंपूर्ण असे शहर बनवले जाणार आहे. इथे 1,04,000 फ्लॅट्स आणि 9000 हॉटेल रुम्स असणार आहेत. मुकाबमध्ये एक महाविद्यालय, रिटेल स्पेस आणि संग्रहालय, चित्रपट गृह, रेस्टॉरंट्स अशा सोयीदेखील मुबलक असणार आहेत. कोणत्याही एका जागेपासून दुसऱया जागी चालत पोहोचायला 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही याचीदेखील काळजी घेतली जाणार आहे. वर्ष 2030 पर्यंत मुकाबचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुकाबविषयी सर्वत्र मोठी उत्सुकता दिसत असली तरी तिच्या आकारामुळे काही वाददेखील निर्माण होत आहेत. मुकाबचा आकार काहीसा मक्का या पवित्र धर्मस्थळासारखा असल्याने तिच्यावर काही ठिकाणांहून टीकादेखील केली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List