अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क कमी करण्यास हिंदुस्थान तयार; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
एकीकडे जागतिक व्यापारयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. अमेरिकन उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्यास हिंदुस्थान तयार झाला आहे. कारण हिंदुस्थानच्या वाढीव आयात शुल्क धोरणाची कोणीतरी पोलखोल करीत आहे, असे विधान ट्रम्प यांनी केले आहे. अमेरिकेचे इतर देशांकडून शोषण केले जात आहे. हे सगळे थांबले पाहिजे, असा इशारा ट्रम्प यांनी संबंधित देशांना दिला आहे.
अमेरिकेतून आयात करण्यात आलेल्या वस्तूंवर हिंदुस्थान प्रचंड शुल्क वसूल करतो. त्यामुळे अमेरिकन उत्पादनांची हिंदुस्थानातील बाजारात विक्री करणे खूप कठीण जात आहे. हिंदुस्थान आपल्या व्यापार पद्धतीमुळे अमेरिकेचे मोठे नुकसान करीत आहे. याची जाणीव हिंदुस्थानला झाली असून शुल्क मोठ्या प्रमाणावर कमी करण्यास हिंदुस्थान अखेर तयार झाला आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
पुढील काही महिन्यांत टेस्ला कंपनी हिंदुस्थानच्या बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. याचदरम्यान हिंदुस्थानने अमेरिकन उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्यास तयारी दर्शवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. हिंदुस्थान सध्या वाहनांवर 110 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारणी करीत आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी हिंदुस्थानातील आयात शुल्क जगभरातील सर्वाधिक शुल्कांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. टेस्लाने यापूर्वी अधिक आयात शुल्कामुळेच हिंदुस्थानच्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा प्लान रद्द केला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List