मुख्यमंत्र्यांनी दम भरला आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, पडद्यामागं काय घडलं? संजय राऊत यांनी सांगितलं
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून राजीनामा दिल्याची चर्चा सुरू होती, मात्र नंतर त्यांनी स्वत: ट्विट करत आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र धनंजय मुंडे यांनी नैतिकतेवरून राजीनामा दिल्याचे म्हटले होते. आता यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी दम भरला आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असे राऊत म्हणाले. या राजीनाम्यावरून पडद्यामागे काय घडले हे देखील त्यांनी सांगितले.
बुधवारी माध्यमांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ‘मुख्यमंत्री सरकारी प्रतिष्ठा आणि प्रतिमा वाचवण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे. बीडमध्ये गदारोळ सुरू असताना, खून पडलेला असताना आणि त्या खुनाचे शिंतोडे मुंडे यांच्यावर उडालेले असताना अजित पवार यांनी त्यांना मंत्रीमंडळात घेणे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावासह यादी राज्यपालांना पाठवणे व त्यांना शपथ देणे इथूनच पॉलिटिकल क्राईमची सुरुवात होते. छगन भुजबळ यांना थांबवले त्याच पद्धतीने तुम्ही धनंजय मुंडे यांना थांबवायला हवे होते.’
धनंजय मुंडे यांची प्रकृती उत्तम आहे. ते काल चुरूचुरू बोलत होते. मला 2 मिनिटंही बोलता येत नाही असे ते म्हणाल्याचे मी ऐकले तेव्हा मलाही त्यांच्याविषयी दया आली. पण काल ज्या पद्धतीने त्यांचा वावर होता, ज्या पद्धतीचे त्यांनी ट्विट केले, ज्या पद्धतीने राजीनाम्याचे पत्र तयार केले त्यावरून त्यांना बीडमधील संतोष देशमुख प्रकरणातील घटनेचा खूप धक्का बसला आहे, ते खूप व्यथित झाले असे दिसत नाही. यावरून स्पष्ट दिसते की मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा द्या नाही तर लाथ घालतो हे सांगितल्यावरच त्यांनी राजीनामा दिला आहे, असे राऊत म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची झळ बसणार नाही, असे अजित पवार म्हणाले. या विधानाचाही राऊत यांनी समाचार घेतला. अजित पवार हे सगळ्यात मोठे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्यावर हे आरोप केले. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा असेल तर आधी अजित पवार यांनी द्यायला पाहिजे, असे राऊत म्हणाले.
पडद्यामागं काय घडलं?
संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली. सोशल मीडियावरही धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोस्ट पडू लागल्या. याच दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा देवगीरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन तास बैठक झाली. या बैठकीस धनंजय मुंडेही उपस्थित होते. याच वेळी फडणवीस यांनी दम भरत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये रात्री दोन तास बैठक; धनंजय मुंडेही उपस्थित, राजीनामा घेणार?
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List