उन्हाळ्यात महागाईचे चटके; कडक उन्हात शहाळ्याच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांना फुटतोय घाम
यंदा मार्च महिन्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. कडक उन्हाळ्यात घशाची कोरड घालविण्यासाठी अनेकजण शहाळ्याचे पाणी पितात. यंदाच्या उन्हाळ्यात शहाळ्यांच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांना घाम फुटत आहे. 35 ते 40 रूपयांना मिळणाऱ्या शहाळ्यासाठी 70 रूपये मोजावे लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात महागाईचे चटके सर्वसामान्यांना सोसावे लागत आहेत.
उन्हाळ्यात घशाला गारवा येण्यासाठी जसं शहाळ्याचे पाणी पितात तसेच आजारी माणासांसाठी शहाळ्याचे पाणी संजीवनी आहे. मात्र शहाळ्याचे दर वाढल्याने या महागाईचा फटका रूग्णांनाही बसला आहे.
कोकणात उत्पादन…तरीही परराज्यातून आयात
नारळ हे कोकणातले उत्पादन आहे. मात्र यंदा नारळाचे उत्पादन घटले आहे. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नारळाचे उत्पादन 60 ते 65 टक्के झाले आहे. त्यामुळे कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमधून शहाळी आयात करावे लागत आहेत. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होत असून शहाळ्याचे दर 70 रुपयांवर पोहोचले आहेत. या दरवाढीनंतर रत्नागिरीतील शहाळी विक्रेते सुनील शिवलकर यांनी दिलगिरी व्यक्त करणारा फलकच आपल्या शहाळ्यांच्या टपरीवर लावला आहे. शहाळ्याचे दर 25 ते 30 टक्के वाढल्यामुळे काही दिवस सहकार्य करण्याची विनंती त्यांनी ग्राहकांना केली आहे.
काढणीसाठी मोजावे लागतात 250 रूपये
नारळ काढणारे मिळत नसल्याने अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. आता नारळ किंवा शहाळी काढण्यांचे दरही वाढले आहेत. एका नारळांच्या झाडावरील नारळ काढण्यासाठी तब्बल अडीचशे रूपये मोजावे लागत आहेत.त्यामुळेही शहाळी आणि नारळाचे दर वाढले आहेत.
शहाळ्यांसोबत नारळाचे दरही वाढले
खाद्यपदार्थांबरोबरच धार्मिक विधी मध्ये वापरण्यात येणारा नारळही महागला आहे. नारळही 40 ते 45 रुपयांवर पोहचला आहे. उत्पादन घडल्यामुळे नारळाचे दरही वाढले आहे.ऐन शिमगोत्सवात नारळ महागल्याने महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List