राज्यात निर्माण झालेले क्रौर्य थांबविण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा; छगन भुजबळ यांची मागणी

राज्यात निर्माण झालेले क्रौर्य थांबविण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा; छगन भुजबळ यांची मागणी

संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, माऊली सोट, कैलास बोऱ्हाडे या घटना राज्याला काळिमा फासणाऱ्या असल्याने यातील आरोपींना कडक शिक्षा करावी. तसेच या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षाचे नेते, विविध समाजातील पदाधिकारी, पत्रकार, साहित्यिक, समाज घटकांना एकत्र बसवून महाराष्ट्राचे क्रौर्य कसे थांबविणार आहोत यावर चर्चा करून सामाजिक सलोखा निर्माण करावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावावर पाठिंबा देताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल महोदयांच्या भाषणावर अभिनंदन प्रस्ताव मांडून राज्यातील वाढती गुन्हेगारी, कांदा, नाशिक कुंभमेळा, महाराष्ट्र कर्नाटक प्रश्न यासह विविध विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, मागच्या काही महिन्यात राज्यातील काही घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. यंत्राचा, तंत्रांचा,मंत्रांचा हा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बहिणाबाई यांच्यासह विविध महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे. मात्र या महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यापासून दृष्ट लागली आहे. बीड मध्ये संतोष देशमुख यांची घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेचा निषेध करतो. आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे. त्याचप्रमाणे परभणी मध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस कोठडीत मृत्युमुखी पडला आहे. या प्रकरणाची चौकशी होणार की नाही ? तो दलीत मागासवर्गीय आहे म्हणून कारवाई होणार की नाही ? लातूर मधील माऊली सोट या धनगर समाजाच्या मुलाला मारहाण करण्यात आली कुणी बोलणार की नाही हा महाराष्ट्र चालला आहे कुठे ? परवा शिवमंदिरात गेला म्हणून जालन्यात कैलास बोऱ्हाडे या धनगर व्यक्तीला लोखंडी सळईने चटके देण्यात आले या प्रकरणावर कुणी बोलणार आहे की नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित करत न्याय हा सर्वांसाठी समान असला पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षाचे नेते, विविध समाजातील पदाधिकारी पत्रकार, साहित्यिक यांना एकत्र बसवून महाराष्ट्राचे क्रौर्य कसे थांबविणार आहोत यावर चर्चा करावी असे आवाहन त्यांनी केले.

राज्यपालाच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावावरील पाठिंबा देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र कर्नाटक प्रश्नावर गेल्या 60 ते 65 वर्षांपासून लढा सुरू असून अद्याप न्याय मिळू शकला नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा. देशाच्या एकुण महसूलातील 14 टक्के वाटा हा महाराष्ट्र सरकारचा आहे. उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक राज्यात येत आहे. ही चांगली बाब आहे. हे उद्योग राज्यातील ग्रामीण भागात पोहचले पाहिजे. ग्रामीण भागातील जमिनींचे दर आणि उद्योगासाठी भूखंडाचे दर याचा मेळ घातला पाहिजे तेव्हा ग्रामीण भागात उद्योग येतील.

येवला मतदारसंघात पैठणीचे मोठ्या प्रमाणात काम चालते. याठिकाणी रेशीम उद्योगाचे काम पूर्वी झाले मात्र याठिकाणी अनुदान बंद झाल्याने शेतकऱ्यांनी रेशीम शेती बंद केली. सरकारने विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना रेशीम शेती मध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ते अनुदान मिळाले पाहिजे. राज्यात शक्ती पीठ सारख्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी शासनाने अधिक लक्ष द्यावे त्यासाठी देखील निधीची तरतूद करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, मुंबई शहरातील बेस्ट वाहतूक सेवा ही पूर्वी अतिशय उत्तम होती. मात्र सध्या ही व्यवस्था अतिशय वाईट अवस्था झाली आहे. ही व्यवस्था अडचणीत आली आहे. जगातील कुठलीही पब्लिक ट्रान्सपोर्ट योजना ही फायद्यात नाही. त्यामुळे सरकारला यासाठी मदतच करावी लागते. ती सरकारने करावी.

येवला शहरात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न अतिशय गंभीर आहे त्यामुळे नगरोत्थान योजनेतून पाणीपुरवठा योजनेसाठी मी प्रयत्न करतो आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगूनही नगरविकास विभागाच्या सचिवांना SLTC बैठक घेण्यासाठी वेळ नाही. प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे,ही अतिशय गंभीर गोष्ट आहे.मागेल त्याला सौर पंप योजना राबविली जात आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पंप मिळत नाही. त्यामुळे पॅनल वर कंपन्यांची संख्या वाढविण्यात यावी. पंतप्रधान घरकुल योजनांमध्ये अतिशय चांगले काम सुरू आहे, कधी नव्हे एवढे घरकुले आपण दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी शेततळे निर्माण करण्यासाठी योजना आहे. मात्र अनुदान मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वितरित करण्यात यावे. इथेनॉलच्या धोरणाबाबत धरसोड पणा करण्यात येऊन नये. कांद्याचे दर कोसळले असून कांद्याचे निर्यात शुल्क हटविण्यात यावे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष द्यावे. अंगणवाडी विद्यार्थ्यांना सर्व महापुरुषांची थोडी थोडी माहिती उपलब्ध करून द्या. नाशिकमध्ये राम-काल पथ प्रकल्प करण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासोबतच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाची कामे देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. मुख्यमंत्री यांनी यात लक्ष घातले आहे त्यामुळे नाशिकचा कुंभमेळा चांगला होईल.

हर घर संविधान ही संकल्पना राबविण्यात येणार आहे ही अतिशय चांगली बाब आहे. त्याचबरोबर मराठी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या निर्णयाबाबत भारत सरकारचे मी अभिनंदन करतो. मात्र मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने काम केले यामध्ये प्रा. हरी नरके यांच्यासह अनेक महत्त्वाच्या लोकांनी काम केले . चक्रधर स्वामींचे लीळाचरित्र या ग्रंथाचा सुद्धा त्यात उपयोग झाला,त्यांचा देखील उल्लेख यामध्ये झाला पाहिजे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर
शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीला धमकावून बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात...
माझ्याकडून लिहून घ्या, नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत; प्रशांत किशोर यांचं भाकीत
महिलांची फक्त पूजा करू नका! दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे प्रतिपादन
लग्नाचे वचन मोडले म्हणजे बलात्कार नाही – सर्वोच्च न्यायालय
‘जंगलाचा राजा’ गुजरातमध्ये असुरक्षित; अवघ्या दोन वर्षांत 286 सिंहांचा धक्कादायक मृत्यू
सोन्याची तस्करी करताना कन्नड अभिनेत्रीला अटक
अपिलाचा निकाल लागेपर्यंत शिक्षेला स्थगिती