शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी 25 मिनिटं हितगुज, Jayant Patil यांनी अखेर सोडलं मौन
राज्यात दोन प्रदेशाध्यक्षांच्या भेटीने नवीन समीकरणाची गोळाबेरीज मांडण्यात आली. प्रसार माध्यमात त्यावर उलटसूलट चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादी फुटल्यापासून जयंत पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडलेली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र तेही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा घडल्या. अशा चर्चा घडवून आणण्यात येत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतो. तर या भेटीमुळे राजकीय भूकंप येणार का याची चर्चा होत असतानाच जयंत पाटील यांनी या सर्व चर्चांना मूठमाती तर दिलीच आणि नाराजी सुद्धा व्यक्त केली.
मध्यरात्री नव्हे संध्याकाळी झाली भेट
जयंत पाटील यांनी या भेटीचा तपशील सुद्धा दिला. सोमवारी संध्याकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाल्याचे ते म्हणाले. त्यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याचे पाटील म्हणाले. सांगली जिल्ह्यातील काही महसूल प्रश्नांवर 10-12 निवेदनं देण्यात आली. या भेटीसाठी आगाऊ वेळ घेण्यात आली होती. महसूल विभागात काही गोष्टी ऑनलाईन केल्याने त्याचा शेतकर्यांना त्रास होत आहे, त्याकडे बावनकुळे यांचे लक्ष वेधल्याचे पाटील म्हणाले. ही भेट 25 मिनिटांची होती. भेटीवेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पण उपस्थित होते, असे पाटील यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा भेट झाल्याचे जाहीर केले.
जयंत पाटील यांची नाराजी
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, अशा अर्धवट बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहेत, असा संताप जयंत पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी समाज माध्यमावर याविषयीची एक पोस्ट केली आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, अशा अर्धवट बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहेत.
वास्तविक मी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांच्या बद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. यामध्ये आष्टा…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 25, 2025
“वास्तविक मी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांच्या बद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. यामध्ये आष्टा येथील ४,६,९ जमिनींचे प्रश्न, आष्टा अप्पर तहसील कार्यालय इमारत प्रश्न, चांदोली वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न, जमिनीवरील शेतकऱ्यांचे प्रश्न, सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूसंपादनाचे प्रश्न अशा विविध प्रश्नांचा समावेश होता. बावनकुळे यांनी संध्या. ६ ची वेळ दिली होती मात्र ते सुनावणीमध्ये असल्याने त्यांना यायला उशीर झाला. त्याच वेळी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्यांच्या काही कामानिमित्ताने बावनकुळे यांना भेटायला आले असल्याने तिथे उपस्थित होते.” असे पाटील यांनी स्पष्ट केले. कालच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. विधानसभा सदस्य म्हणून एखाद्या मंत्र्याला त्यांच्या विभागाच्या कामासंदर्भात भेटणे हे काही गैर नाही. तरीही प्रसारमाध्यमे अशा प्रकारच्या बातम्या बनवितात हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List