‘शक्ती’ कायदा अजून किती काळ केंद्र-राज्याच्या प्रश्नोत्तराच्या साखळदंडात अडकलेला राहणार? अंबादास दानवे यांचा संतप्त सवाल
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
या घटनेवरून पुन्हा एकदा राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात महिला व तरुणीवर होणारा अत्याचार कमी होण्यासाठी आंधप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणला होता. या कायद्यात महिलांवरील अत्याचाऱ्याला थेट फाशीच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. या कायद्याला विधानपरिषद व विधानसभेची मंजुरी मिळाली मात्र अंतिम मंजुरीसाठी तीन वर्षापूर्वी केंद्र सरकारला पाठविण्यात आले. परंतु अद्यापही त्या कायद्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्या घटनेवरून आणि शक्ति कायद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून केंद्र व राज्य सरकारला फटकारले आहे. तसेच ‘शक्ती’ कायदा अजून किती काळ केंद्र-राज्याच्या प्रश्नोत्तराच्या साखळदंडात अडकलेला राहणार? असा संतप्त सवाल देखील केला आहे.
पुण्यातील महिलेला बसमध्ये नेऊन घडलेली अत्याचाराची घटना भयंकर आहे. मुळात अश्या घटनांमध्ये आतात्याने वाढ होत असताना ‘शक्ती’ कायदा अजून किती काळ केंद्र-राज्याच्या प्रश्नोत्तराच्या साखळदंडात अडकलेला राहणार आहे? हा कायदा अस्तित्वात न आणून सरकार काय साध्य करू पाहत आहे? फडणवीसजी, महिलांना सुरक्षा देण्यासाठी सरकार नाही तर मग कशासाठी आहे? असा सवाल अंबादास दानवे यांनी या ट्विटरवर पोस्ट शेअर करत केला आहे.
अत्याचाराच्या घटनांचा आलेख चिंताजनक
2023 मध्ये बलात्काराच्या 7 हजार 521 घटना, अपहरणाच्या 9 हजार 698 घटना, हुंडाबळीच्या 169 घटना, क्रूर पद्धतीने त्रासाच्या 11 हजार 226 घटना, लैंगिक अत्याचार 17 हजार 281 घटना घडल्या आहेत. तसेच मे 2024 अखेरपर्यंत बाल लैंगिक अत्याचारसंदर्भात 509 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List