आधी यूपीएससी उत्तीर्ण, नंतर बांधली लग्नगाठ; परीक्षेची तयारी एकत्र, दोघांनाही दोनदा आले अपयश
आधी नोकरी अन् मग लग्नाचा विचार करणाऱ्या तरुणाईसाठी एक उत्तम उदाहरण बिहारमध्ये दिसले आहे. आयएएस अधिकारी झालेल्या प्रवीण कुमार आणि अनामिका सिंह या दोघांनी यूपीएससीसाठी एकत्रच तयारी केली होती. त्यांच्या या तयारीला यश आले असून हे दोघेही आता आयएएस अधिकारी झाले आहेत. आयएएस अधिकारी होताच या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचा विवाह नुकताच गोरखपूरमध्ये पार पडला. या विवाह सोहळ्याला राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी, मित्रमंडळी उपस्थित होते. प्रवीण कुमार सध्या नालंदा जिल्ह्यात हिल्साचे उपविभागीय न्यायदंडाधिकारी (एसडीएम) पदी आहेत, तर अनामिका या उत्तराखंडच्या गढवाल जिल्ह्यात उपविभागीय न्यायदंडाधिकारी (एसडीएम) पदी कार्यरत आहेत. प्रवीण कुमार हे मूळचे बिहारमधील जमुई येथील रहिवासी आहे. वडील मेडिकल स्टोअर चालवतात, तर आई घर सांभाळते. प्रवीण यांनी जमुई येथून इंटरमिजिएटपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर जेईई उत्तीर्ण केली. आयआयटी कानपूरमधून बीटेक पूर्ण केले. काही दिवस नोकरी केली. त्यानंतर यूपीएससीची तयारी केली.
कठोर परिश्रम हेच प्रेमाचे प्रतीक
प्रवीण कुमार आणि अनामिका सिंह हे दोघेही यूपीएससीची तयारी करताना एकत्र होते. तसेच दोघेही पहिल्या दोन प्रयत्नांत अयशस्वी झाले, परंतु त्यांनी आयएएस अधिकारी होण्याची जिद्द सोडली नाही. यासाठी दोघांनीही कठोर परिश्रम घेतले. त्यानंतर दोघेही तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले. त्यांना ओळखणारे लोक त्यांच्या मेहनतीचे आणि प्रेमाचे कौतुक करत आहेत. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. प्रवीण आणि अनामिका हे दोघेही या आधी यूपीएससी परीक्षेत दोनवेळा अयशस्वी ठरले होते. परंतु त्यांनी हार न मानता तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसनी घातली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List