‘शिंदेचा सत्कार नव्हे महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार’, संजय राऊतांचा थोरल्या पवारांवर थेट निशाणा, महाविकास आघाडीत ठिणगी?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत मराठा पातशाहीचे धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. विशेषतः महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. आज सकाळच्या पत्र परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार, एकनाथ शिंदे आणि भाजप यांना खडेबोल सुनावत महाराष्ट्र धर्माची आठवण करून दिली. त्यावरून राज्यात पुन्हा शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हं आहेत.
हा तर महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार
यावेळी संजय राऊत यांनी दिल्लीतील शिंदेंच्या सत्कार सोहळ्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार नाही तर त्यांनी जणू अमित शाह यांचा सत्कार केला आहे, असे आम्ही मानतो. हा महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार आहे, असा घणाघात राऊतांनी केला. त्यांनी शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जायला नको होते, त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावायला नको होती, अशी जाहीर नाराजी व्यक्त केली.
पवारांनी जायला नको होतं
शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाह यांच्या सहकार्याने फोडली. महाराष्ट्राशी गद्दारी केली. त्या एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमाला पवारांनी जायला नको होतं. यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण काय आहे हे माहिती नाही. पण आम्हालाही दिल्लीतील राजकारण कळतं पवार साहेब, असा घणाघात राऊतांनी घातला.
कोण, कोणाला टोप्या घालतंय हेच कळेना
कोण,कोण कोणाला टोप्या घालतंय आणि टोप्या उडवतंय हेच काही कळेनास झालं आहे. कोण गुगली टाकतंय हे कळत नाही. गद्दारांना असे सन्मान देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का असल्याचे राऊत म्हणाले. दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमात शरद पवार गेल्याने, संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली. यामुळे या सत्कार सोहळ्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List