अलिबागचे उमटे धरण होणार गाळमुक्त, 47 गावांसह 33 वाड्यांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार
अलिबाग तालुक्यातील 47 गावांसह 33 वाड्यांचा पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. रामराज परिसरात असणाऱ्या उमटे धरण मजबुतीकरण आणि नूतनीकरणासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून धरण गाळमुक्त होणार आहे. धरण गाळमुक्त झाल्यास अलिबागकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995 साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित झाले. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट आहे. पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर, धरणाची उंची 56.40 मीटर आहे. धरणाच्या पाण्यावर 47 गावे व 33 आदिवासी वाड्या अवलंबून आहेत. मात्र धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
वनविभागाच्या वाढीव प्रस्तावास आडकाठी
उमटे धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. 14 लाख पाणीसाठा करणारे नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहेत. यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र आजही नागरिकांना जलशुद्धीकरण प्रकल्प बसवूनही अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. मागील वर्षी परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान करून गाळ काढला होता. प्रशासनानेही यंत्रणा लावून गाळ उपसा केलेला आहे. आतापर्यंत 11 हजार 652 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
जलशुद्धीकरण प्रकल्प असूनही दूषित पुरवठा
उमटे धरणाच्या एकंदरीत परिस्थितीचा अलिबागचे तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता प्रल्हाद बिराजदार यांनी अभ्यास करून कायमस्वरूपी प्रश्न सुटण्यासाठी पुढाकार घेतला होता. धरण हे जीर्ण झाले असून ते मजबूत आणि नूतनीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्या माध्यमातून 99 कोटींचा डीपीआर बनविण्यात आला होता. मात्र वनविभागाने या प्रस्तावास आडकाठी घातली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List