मंत्र्यांच्या ओएसडी व पीएस यांना एक कायदा आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांसाठी दुसरा, हा कसला न्याय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 मंत्र्यांच्या ओसडी आणि पीएसची यादी रोखली आहे. फिक्सर म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा आहे त्या नावांना मान्यता देणार नाही, असा दम फडणवीस यांनी भरला. याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले. मंत्र्यांच्या ओसडी व पीएस यांना एक आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांसाठी दुसरा कायदा, हा कसला न्याय? असा सवालही सुळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना केला.
ज्या ओएसडी किंवा पीएसवर कुठलेही आरोप झाले असतील त्या फिक्सरला घेणार नाही, असा निर्णय फडणवीस यांनी घेतला. हा अतिशय चांगला निर्णय असून याचे स्वागत आहे. ज्यांच्यावर आरोप झाले, ज्यांच्याव केस असेल त्यांना मंत्रालयात ठेवणार नाही म्हणता, पण ज्यांना शिक्षा झाली, ज्यांच्यावर आरोप झाले, ती कागदपत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचली त्यांना वेगळा न्याय का? सरकार खरंच भ्रष्टाचारमुक्त असेल तर वाशिंग मशीन फक्त निवडक लोकांसाठी चालणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सातवा आरोपी अजूनही गायब
दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सातवा आरोपी अजूनही गायब आहे. एक माणूस गेले 72 दिवस सापडत नाही याच्यावर माझा विश्वास नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच बीडच्या दोन्ही कुटुंबांसह परभणीच्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे. तिन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे, असेही त्या म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List