नीतू कपूर यांना नातीने ढकललं? व्हायरल व्हिडीओवर रणबीरच्या बहिणीने सोडलं मौन, म्हणाली “ती बिचारी..”
अभिनेता रणबीर कपूरची भाची समारा सहानी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. मामा आदर जैनच्या लग्नातील तिचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना आजी नीतू कपूर यांना बाजूला ढकलल्याचं दिसून येत आहे. समाराचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हे काय वागणं आहे, तिची नेमकी समस्या काय आहे.. असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले. त्यावर आता रणबीरची बहीण आणि समाराची आई रिद्धिमा कपूर सहानीने प्रतिक्रिया दिली आहे. समारा तिच्या आजीला धक्का देत नव्हती, असं तिने स्पष्ट केलंय.
“हे संपूर्ण प्रकरण गरजेपेक्षा जास्त चघळलं जातंय. ती बिचारी मुलगी फक्त फोटोसाठी पोझ देण्याचा प्रयत्न करत होती. ती काही नाराज नव्हती. उलट कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ती खूप उत्साही होती. कारमध्ये ती म्हणत होती की, “ओह माय गॉड, तिथे नक्कीच फोटोग्राफर्स असतील आणि मी त्यांच्यासमोर फोटोसाठी असे पोझ देईन.” पापाराझींनी आम्हा तिघींना एकत्र फोटोसाठी पोझ द्यायला सांगितलं होतं. पण तिला स्वत:ला वेगळी पोझ द्यायची होती. म्हणून ती तशी उभी राहिली. तिने तिच्या आजीला ढकललं नाही”, असं रिद्धिमाने स्पष्ट केलंय.
व्हायरल व्हिडीओवरून झालेल्या ट्रोलिंगबद्दल समारालाही आश्चर्य वाटल्याचं, रिद्धिमाने सांगितलं. “मी आजीला कधी ढकललं, असा प्रश्न ती मला विचारत होती. मी फक्त फोटोसाठी पोझ देताना माझा हात बाजूला करत होते, जेणेकरून मी कम्फर्टेबल उभी राहू शकेन, असं ती म्हणाली. तिने कोणालाच ढकललं नाही”, असं रिद्धिमा पुढे म्हणाली.
samara pushing neetu out of the frame
byu/vishaw_kalra inBollyBlindsNGossip
रिद्धिमाची मुलगी समारा याआधीही तिच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एअरपोर्टवर समाराने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले होते. त्यावेळी तिने एखाद्या मॉडेलप्रमाणेच फोटोसाठी पोझ देण्याचा प्रयत्न केला असता, नेटकऱ्यांनी त्यावरूनही तिला ट्रोल केलं होतं. “मी काही केलं तरी त्यांना समस्या आहे आणि आता मी काही नाही केलं तरी ते माझ्याबद्दल बोलत आहे”, अशी तक्रार समाराने बोलून दाखवल्याचं रिद्धिमाने सांगितलं. किंबहुना सोशल मीडिया आणि ट्रोलिंगबद्दल तिला सतत जागरूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं रिद्धिमाने स्पष्ट केलं.
“आजकालच्या मुलांना याबद्दल अधिक माहिती असते. कारण सोशल मीडियावर त्यांना बरंच काही पहायला मिळतं. पण तरीसुद्धी मी आणि माझी आई (नीतू कपूर) समारासोबत याबद्दल मोकळेपणे बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याचे फायदे, तोटे, चांगलं, वाईट या सगळ्या गोष्टी आम्ही तिला सांगतो. जेणेकरून तिच्यावर या गोष्टींचा फारसा परिणाम होणार नाही”, असं रिद्धिमा म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List