महाराष्ट्राच्या बसवर हल्ला, काळं फासलं; परिवहन मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर, कर्नाटक सरकारला कडक इशारा
कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. बसला काळं फासण्यात आलं आहे, तसेच चालकाला मारहाण देखील करण्यात आली. कन्नड भाषा येत नसल्याच्या मुद्द्यावरून चालकाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर आता महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रताप सरनाईक?
वाद वाढायला नको, या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे. गावगुंडांनी प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राची बस अडवली हे बरोबर नाही, तुमच्या देखील बसेस महाराष्ट्रात येतात असा इशारा यावेळी सरनाईक यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद आजचा नाही, एकनाथ शिंदे यांनी 2 महिने कारावास भोगला आहे. आम्ही आधी शिवसैनिक आणि नंतर मंत्री आहोत, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत.
झालेला प्रकार निषेधार्थ आहे, गावगुंडांवरती गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. कठोर कारवाईच्या सूचना देखील दिल्या आहेत. आम्ही त्यांना धडा कसाही शिकू शकतो. शिवसेनेची स्थापना भल्यासाठी झाली आहे, याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर होणार आहे. महाराष्ट्रातील शिवसैनिक हातात बांगड्या घालून बसलेला नाही, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान एसटी बस तोट्यात आहे, अशी बातमी समोर येत आहे. यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या राज्यात ज्या-ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या -त्या गोष्टी आपल्या राज्यामध्ये आणणे गरजेचे आहे. राज्यातील प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊ असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
कर्नाटकात नेमकं काय घडलं?
कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून कन्नड भाषेचा मुद्दा पुढे करत, महाराष्ट्राच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. बसला काळं फासण्यात आलं आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर बस चालकाला देखील मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट दिसून येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List